लग्नातला पुलाव बेचव

By Admin | Published: October 17, 2015 01:19 AM2015-10-17T01:19:39+5:302015-10-17T01:19:39+5:30

कोणत्याही विवाह समारंभामध्ये निमंत्रितांसाठी विशेष पदार्थ असतात व त्यात पुलाव या पदार्थाचाही समावेश केला जातो. त्या पदार्थामुळे पाहुण्यांनी तृप्तीचा ढेकर दिला

Wedding cavity | लग्नातला पुलाव बेचव

लग्नातला पुलाव बेचव

googlenewsNext

कोणत्याही विवाह समारंभामध्ये निमंत्रितांसाठी विशेष पदार्थ असतात व त्यात पुलाव या पदार्थाचाही समावेश केला जातो. त्या पदार्थामुळे पाहुण्यांनी तृप्तीचा ढेकर दिला, तर यजमानही समाधान व्यक्त करतात, परंतु पदार्थ जर बिघडला, तर पाहुणे खट्टू होतात. कॅमेरामन ते दिग्दर्शक असा प्रवास केलेले विनोद प्रधान यांच्या ‘वेडिंग पुलाव’ची चव बिघडल्याने त्याला कुठेच गुण देता येत नाहीत.
‘वेडिंग पुलाव’ची कथा चार मित्रांची आहे. त्यात आदित्य (दिगंत मशेल) आणि अनुष्का (अनुष्का रंजन) हे लहानपणापासूनचे खास मित्र. आदित्यवर नाराज होऊन अनुष्का लंडनला निघून जाते व आदित्यच्या साखरपुड्याला परत येते. आदित्यचे लग्न रेहाशी (सोनाली सहगल) होणार आहे. या कार्यक्रमात अनुष्का तिच्या जे (करण ग्रोव्हर) नावाच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगते. एकाच मांडवात आदित्य व रेहा आणि अनुष्का व जे यांचे लग्न करण्याचे निश्चित केले जाते. या दोन्ही लग्नांसाठी सगळे वऱ्हाडी बँकाकला येतात, पण तेथे आदित्य आणि अनुष्का यांना आपण एकमेकांच्या प्रेमात असल्याची जाणीव होते. आता काय करावे, अशा द्विधा मन:स्थितीत ते सापडतात. शेवटी वेडिंग पुलाव आनंदी शेवट होऊन संपतो.
चित्रपटाच्या उणिवा - कथेपासून कलाकारांपर्यंत हा चित्रपट अनेक अंगांनी कमकुवत बनला आहे. अनेक चित्रपटांत पूर्वी येऊन गेलेले कथानकच परत यात वापरण्यात
आले आहे. पुन्हा ते अत्यंत
नीरसरित्या सादर केले आहे.
चित्रपटात असे एखादे दृश्य असेल की, त्याला नवे म्हणता येईल, असे नाही. दुबळी कथा आणि वाईट पटकथेत बरे म्हणण्यासारखे काहीही नाही. चित्रपट पहिल्या दृश्यापासून छळायला सुरुवात करतो, ते अगदी शेवटपर्यंत. कलाकारांच्या कामाबद्दल म्हणावे, तर यात ऋषी कपूरसारख्यालादेखील व्यवस्थित भूमिका दिली गेलेली नाही. बँकॉकमधील हॉटेलच्या व्यवस्थापकाच्या भूमिकेत ऋषी कपूर यांनी निराश केले.
मुख्य कलाकारांबद्दल बोलायचे, तर प्रथमच पडद्यावर आलेली अनुष्का रंजनवरच सगळ््यात जास्त प्रकाशझोत ठेवण्यात आला आहे. अनुष्का रंजन ही चित्रपटाचा निर्माता शशी रंजन आणि अनु रंजन यांची मुलगी आहे. अनुष्का दिसायला आकर्षक असली, तरी अभिनयाबाबत फारच कच्ची आहे. तिच्या लुक्समुळे जुही चावलाची आठवण येईल. अनुष्काबरोबर दिगंत मशेल, करण ग्रोव्हर आणि सोनाली सहगलपैकी कोणाचेही काम अगदी ठीक आहे, असेही म्हणवत नाही. मुख्य कलाकारच कमकुवत आहेत म्हटल्यावर, सहायक कलाकारांबद्दल न बोललेले बरे.
वैशिष्ट्ये-
ज्याची कथा आणि कलाकारांचे काम कमकुवत आहे, अशा या चित्रपटात चांगले म्हणता येईल, असे काहीही नाही. मैत्री आणि प्रेम यावरील काही दृश्ये प्रेक्षकांना आवडू शकतील.
का पाहावा-
काहीही विशेष कारण नाही.
का पाहू नये-
वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी.
एकूण काय, तर हा पुलाव पूर्णपणे बेचव असून, त्याची चव चाखणाऱ्याचे तोंड नक्कीच कडू होईल.

Web Title: Wedding cavity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.