नागराज मंजुळे आहे दत्तकपुत्र; तुम्हाला माहितीये का त्यांचं खरं नाव?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 10:00 AM2023-08-15T10:00:00+5:302023-08-15T10:00:00+5:30
Nagraj manjule: नागराज यांच्या वडिलांनी काही कारणास्तव त्यांना दत्तक दिलं होतं.
उभ्या महाराष्ट्राला 'सैराट' करुन सोडणारा नामवंत दिग्दर्शक, अभिनेता म्हणजे नागराज मंजुळे (Nagraj manjule). आजवरच्या कारकिर्दीत नागराज यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शक केलं. विशेष म्हणजे मराठी कलाविश्वापासून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास बॉलिवूडपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 'सैराट', 'पिस्तुल्या', 'नाळ', 'झुंड' असे कितीतरी दर्जेदार सिनेमा त्यांनी कलाविश्वाला दिले. विशेष म्हणजे नागराज यांच्या फिल्मी करिअरविषयी साऱ्यांना ठावूक आहे. मात्र,त्यांच्या पर्सनल आयुष्याविषयी फारसं कोणाला माहित नाही.
नागराज मंजुळे यांचा 'बापल्योक' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या ते या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. या अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्याविषयी एक मोठा खुलासा केला. नागराज पोपटराव मंजुळे यांचं खरं नाव काही वेगळंच आहे.इतकंच नाही तर ते दत्तकपुत्र आहेत असंही त्यांनी सांगितलं.
"माझ्या मोठ्या चुलत्याने (काका) मला दत्तक घेतलं होतं. त्यांचं नाव आहे बाबुराव. त्यामुळे माझं कायदेशीर नाव नागराज बाबुराव मंजुळे असं आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या मोठ्या भावाला मला दत्तक दिलं होतं. तेव्हापासून मी माझं नाव नागराज बाबुराव मंजुळे असंच लिहायचो. पण, एकदा एका नियतकालिकाला मी माझी कविता पाठवली. या कवितेच्या खालती मी फक्त नागराज मंजुळे असं लिहिलं होतं. त्यावेळी त्यांना (पोपटराव मंजुळे यांना) हे आवडलं नाही. माझा मोठा भाऊ, जे तुझे वडील आहेत, त्याचं नाव तू लिहिलं पाहिजे. बाबुराव हे नाव काढू नकोस", असं त्यांनी मला बजावलं.
पुढे ते म्हणतात, "त्यावेळी मला खूप आश्चर्य वाटलं की हे त्यांच्या मोठ्या भावाचं नाव मला लावायला सांगत आहेत. ज्यांच्याकडे मला दत्तक दिलं होतं. त्यांचं नाव टिकवावं यासाठी ते करतायेत असं वाटलं. पण, तेव्हापासून मी माझ्या कवितेला नागराज बाबुराव मंजुळे असं नाव लिहायला लागलो. परंतु, माझ्या आयुष्यात दुसरं काही केलं तर नागराज पोपटराव मंजुळे हेच नाव लावणार असं माझं आधीपासूनच ठरलं होतं.आणि, अपघाताने मी सिनेसृष्टीत आलो. तेव्हापासून माझ्या पहिल्या सिनेमापासून मी सगळीकडे नागराज पोपटराव मंजुळे असंच नाव लिहितो."
दरम्यान, नागराज मंजुळे यांचा बापल्योक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २५ ऑगस्टला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातून बाप आणि लेकाची उत्तम कहाणी उलगडली जाणार आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत.