सुलोचनादीदींच्या जडणघडणीचे कोल्हापूर साक्षीदार, मा. विनायक, भालजी पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली करिअरची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 12:14 PM2023-06-05T12:14:46+5:302023-06-05T12:28:38+5:30
चित्रपटाच्या पडद्यावर मराठमोळ्या स्त्रीप्रतिमेला अधिक उज्ज्वल करणाऱ्या या अभिनेत्रीच्या निधनामुळे कोल्हापूरमध्येही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
कोल्हापूर : आपल्या सोज्वळ, शालीन व्यक्तिमत्त्वाने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या सुलोचनादीदींची जडणघडण कोल्हापुरातच झाली. मा. विनायक यांनी त्यांना पहिल्यांदा संधी दिली आणि भालजी पेंढारकर यांनी त्यांच्या केवळ कारकिर्दीला दिशाच दिली नाही तर रंगुताईंचे नाव बदलून त्यांना ‘सुलोचना’ हे नावदेखील दिले. चित्रपटाच्या पडद्यावर मराठमोळ्या स्त्रीप्रतिमेला अधिक उज्ज्वल करणाऱ्या या अभिनेत्रीच्या निधनामुळे कोल्हापूरमध्येही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील खडकलाट हे दीदींचे मूळ गाव. चौथीपर्यंत शिकलेल्या या मुलीला चिकोडीतील ॲड. पुरुषोत्तम बेनाडीकर यांनी आपला विद्यार्थी असलेल्या मा. विनायक यांना सांगून त्यांच्या प्रफल्ल कंपनीमध्ये घ्यायला लावले आणि दीदींचा चित्रपट प्रवास सुरू झाला. तेव्हा एक्स्ट्रा कलाकार असेच काम असताना त्यांना अनेकवेळा अपमानास्पद वागणूक सोसावी लागली. शेरेबाजी ऐकावी लागली; परंतु, त्यांनी धीर सोडला नाही.
प्रफुल्ल पिक्चर्स पुण्याला हलल्यानंतर दीदी पती आबासाहेब चव्हाण यांच्यामुळे भालजी पेंढारकर यांच्या प्रभाकर स्टुडिओमध्ये काम मिळाले. ‘महारथी कर्ण’ या हिंदी चित्रपटामध्ये त्यांना दासीची भूमिका मिळाली. छोटी मोठी कामे करत असताना सन १९४४-४५ साली कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार होता. यासाठी मुंबई, पुण्याची अनेक बडी मंडळी कोल्हापूरला येणार होती. यासाठी भालजी पेंढारकर यांनी ‘करीन ती पूर्व’ हे शिवकालीन ऐतिहासिक नाटक बसवण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये दीदींनी प्रमुख भूमिका मिळाली आणि त्याचे त्यांनी सोने केले.
अशा पद्धतीने भालजींच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू असतानाच त्यांचा ‘मीठभाकर’ चित्रपट पूर्ण झाला. तो प्रदर्शित होण्याच्या काळातच महात्मा गांधींची हत्या झाली आणि भालजी पेंढारकरांचा स्टुडिओ जाळून टाकण्यात आला. या ठिकाणी सुलोचना यांच्यावर आभाळच कोसळले. यानंतर त्यांनी पुन्हा खडकलाटला जाण्याचा निर्णय घेतला; परंतु, पुण्याहून वामनराव कुलकर्णी यांचा निरोप घेऊन मा. विठ्ठल कोल्हापुरात आले आणि सुलोचना यांचा प्रवास पुण्याच्या दिशेन सुरू झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
सुस्वरूप चेहरा, सशक्त अभिनयाच्या जोरावर तब्बल ३५० हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करत सुलोचनादीदींनी अखंड भारतामध्ये अभिनेत्री म्हणून आपली अविस्मरणीय अशी प्रतिमा निर्माण केली. ज्यात कोल्हापूरचा सिंहाचा वाटा आहे.
रविवार पेठेत वास्तव्य
सुलोचनादीदींचे रविवार पेठेतील जैन गल्लीत वास्तव्य होते. कॉमर्स कॉलेजसमोर असणाऱ्या सोळंकी कोल्ड्रिंक हाउसच्या पाठीमागील बाजूस नारायणपुरे यांच्या मालकीच्या इमारतीत त्यांचे वास्तव्य असे. कांचन यांचा जन्म याच ठिकाणी झाल्याचे सांगण्यात येते. भालजी पेंढारकर यांचा स्टुडिओ पेटवण्यात आला तेव्हा सुलोचना यांनी येथूनच स्टुडिओकडे धाव घेतली होती आणि त्या ओक्साबोक्शी रडत होत्या.
भालजी पेंढारकरांच्या नावे संस्थेची घोषणा
आठवण सांगताना ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी म्हणाले, भालजी पेंढारकर यांना जाहीर झालेला दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना कोल्हापूरमध्ये देण्याचा निर्णय झाला. केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी अचानक आधी कोणालाही कसलीही कल्पना नसताना सुलोचनादीदींनी कोल्हापूरमध्ये भालजी पेंढारकर यांच्या नावे एखादी कला संस्था सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आम्हाला सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु, बाबांवरील प्रेमापोटीच त्यांनी तो निर्णय घेतला आणि याच ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी २५ लाख रुपयांचा निधीही जाहीर केला.
शेवटपर्यंत अध्यक्ष
भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या सुलोचनादीदी शेवटपर्यंत अध्यक्ष म्हणून होत्या. याबाबत केंद्राचे कार्यवाह श्रीकांत डिग्रजकर म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून त्या कामकाजात सक्रिय नव्हत्या. परंतु, अतिशय आस्थेने त्यांनी आपल्या गुरूच्या नावे असलेल्या या संस्थेच्या कामासाठी वेळ दिला. अतिशय आस्थेवाईक असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हा सर्वांना मुंबईला बोलावले होते. संस्थेच्या कामकाजासाठी मुंबईला गेले की लॉजवर राहण्यापेक्षा घरीच राहत जा, असा त्यांचा आग्रह असे.
फाळके पुरस्कार मिळालाच नाही
भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये प्रचंड असे योगदान देऊनही शेवटपर्यंत दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मात्र मिळाला नाही याची खंत त्यांच्या चाहत्यांना आणि निकटवर्तीयांना आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जानेवारी २०२३ मध्ये कोल्हापूर दौरा झाला. त्यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी शाह यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले होते.
अन् लता मंगेशकरांसारखी मैत्रीण मिळाली
मा. विनायक यांच्याकडे काम करत असताना एकदा एका नायिकेच्या मेकअपरूममध्ये सुलाेचना बसल्या होत्या. तेव्हा या नायिकेने तेथून त्यांना बाहेर काढले. त्यामुळे त्या रडत असताना एक मुलगी त्यांच्याजवळ आली. का रडतेस म्हणून विचारले. हाताला धरून त्याच खोलीत नेले आणि तेथे गप्पा मारत बसल्या. यावेळी ती नायिकाच येथून चरफडत निघून गेली. ही त्यावेळी मिळालेली मैत्रीण म्हणजे लता मंगेशकर होय. ज्यांचा स्नेह शेवटपर्यंत टिकून राहिला होता.