KBC 11 : अमिताभ बच्चन यांच्या ‘केबीसी’ होस्ट करण्याच्या निर्णयाला होता अख्ख्या कुटुंबाचा विरोध पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 03:58 PM2019-09-27T15:58:55+5:302019-09-27T16:05:39+5:30
Kaun Banega Crorepati 11 : अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. गत 19 वर्षांपासून अमिताभ हा शो होस्ट करत आहेत. 2000 मध्ये हा शो सुरु झाला होता.
अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. गत 19 वर्षांपासून अमिताभ हा शो होस्ट करत आहेत. 2000 मध्ये हा शो सुरु झाला होता. हा शो ऑफर झाला तेव्हा अमिताभ बच्चन अक्षरश: ‘रोडपती’ झाले होते. अमिताभ प्रचंड मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते. त्यामुळे ‘कौन बनेगा करोडपती’ची ऑफर येताच अमिताभ यांनी ती लगेच स्वीकारली. अगदी अख्खे कुटुंब या निर्णयाच्या विरोधात असतानाही. होय, अमिताभ यांच्या टीव्ही शो होस्ट करण्याच्या निर्णयाला अख्ख्या कुटुंबाचा विरोध होता. जया बच्चन यांचा तर कठोर विरोध होता. खुद्द अमिताभ यांनी सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये याबद्दल सांगितले होते.
‘मला टीव्ही प्रोजेक्टची ऑफर आली होती. हे आम्हा सर्वांसाठी धक्कादायक होते. मी टीव्हीवर काम करू नये, असे सगळ्यांचे मत होते. टीव्ही काम केल्याने माझी प्रतीमा खराब होईल, असे त्यांचे मत होते. पण माझ्याकडे कुठलाही दुसरा पर्याय नव्हता. पैशांसाठी लादी पुसण्याचे काम कुणी मला दिले असते तर तेही मी त्यावेळी केले असते,’ असे अमिताभ यांनी या मुलाखतीत सांगितले होते.
अमिताभ बच्चन यांनी ‘अमिताभ बच्चन कॉपोर्रेशन लिमिटेड’ नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीने काही चित्रपटांची निर्मिती केली, मात्र सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले होते. या कंपनीसाठी अमिताभ यांनी अनेक ठिकाणाहून कर्ज घेतले, मात्र अखेर कंपनी डुबली. त्याचदरम्यान त्यांचे चित्रपटही फ्लॉप ठरु लागले. अमिताभ चहूबाजुंनी अडचणीत सापडले. अशा कठीण परिस्थितीत २००० हे वर्ष आणि ‘कौन बनेगा करोडपती’ची ऑफर अमिताभ यांच्यासाठी आशेचे किरण ठरले. कुटुंबाच्या विरोधात जाऊन अमिताभ यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करण्याची त्यांना संधी घेतली आणि या शोद्वारे इतिहास रचला. ‘कौन बनेगा करोडपती’ला तुफान लोकप्रियता मिळाली आणि जणू अमिताभ यांचा नवा जन्मच झाला.