सगळ्या गोष्टींचा उबग येतो, तेव्हा गझलच जवळची वाटते

By Admin | Published: March 24, 2017 01:01 AM2017-03-24T01:01:59+5:302017-03-24T01:01:59+5:30

आपल्या सुरमयी आवाजाने गझलप्रेमींना वेड लावणारे जगप्रसिद्ध गझलगायक पंकज उधास यांनी गझल गायकीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

When everything is boring, the ghazal seems so close | सगळ्या गोष्टींचा उबग येतो, तेव्हा गझलच जवळची वाटते

सगळ्या गोष्टींचा उबग येतो, तेव्हा गझलच जवळची वाटते

googlenewsNext

आपल्या सुरमयी आवाजाने गझलप्रेमींना वेड लावणारे जगप्रसिद्ध गझलगायक पंकज उधास यांनी गझल गायकीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. १९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’ चित्रपटातील डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या ‘चिठ्ठी आई है...’ या गाण्याने पंकज उधास घराघरांत पोहोचले. यानंतर पंकज उधास यांनी ‘साजन,’ ‘यह दिल्लगी,’ ‘फिर तेरी कहानी याद आई’ अशा अनेक चित्रपटांत आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. लवकरच मुंबईत ‘द गझल सिंफनी’ हा गझल महोत्सव होणार आहे. या महोत्सवात पंकज यांच्यासह सुप्रसिद्ध गायक अनुराग शर्मा, व्हायोलियनवादक दीपक पंडित, ‘मेरे ढोलना’फेम गायिका अन्वेशा यांच्या सुरांची बरसात होणार आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा... प्रश्न : पंकजजी, ‘द गझल सिंफनी’बद्दल काय सांगाल? ‘द गझल सिंफनी’ एक अभिनव कन्सेप्ट आहे. लाईव्ह आॅर्केस्ट्रासोबत गझल, असा एक अनोखा प्रयोग यानिमित्ताने श्रोत्यांना आणि गझलप्रेमींना अनुभवता येणार आहे. आधी कधीही कुणी ऐकली नसेल, अशा नव्या ढंगात आणि रंगातील गझल या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. प्रश्न : आपल्या मते, गझल काय आहे? गझल माझा आत्मा आहे. गझल ऐकायची नसते तर ती अनुभवायची असते. गझल रोमारोमांत भिनते. गझल कानापर्यंत नाही तर थेट हृदयाला जाऊन भिडते. गझलचे दुसरे नाव आहे, ‘असर.’ ऐकणाऱ्यावर गझलेचा परिणाम होणार आणि होणारच. कोई भी गझल के असर से बच नहीं सकता. प्रश्न : गझल नसती तर आयुष्याचा प्रवास तुम्हाला कुठल्या मुक्कामावर घेऊन गेला असता? (हसत हसत) हे तर ठाऊक नाही. आज मी जे काही आहे, ते केवळ आणि केवळ गझलमुळे आहे. गझल नसती तर कदाचित माझे अस्तित्व नसते. पण गझलगायक झालो नसतो तर मी डॉक्टर असतो. मी विज्ञानात पदवी घेतली आहे. मला डॉक्टर होण्याची इच्छा होती आणि म्हणून मी जाणीवपूर्वक विज्ञान शाखा निवडली होती. पण एका वळणावर गझलने असे काही मोहित केले, की मी नकळत तिच्या सौंदर्यात वाहावत गेलो. प्रश्न :संघर्षाचा एक मोठा काळ आपण अनुभवला आहे.या काळात कुठल्या एका गोष्टीने आपल्याला बळ दिले? माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद आणि शिकवण या एका गोष्टीने मी संघर्षाचा तो काळ पचवू शकलो. आयुष्यात कधीही निराश होऊ नको. एक दिवस तू खूप मोठा गायक होशील, हे माझ्या आई-बाबांचे शब्द मला आजही आठवतात. त्यांचा माझ्यावरचा हा विश्वास मला सार्थ करून दाखवायचा होता. कदाचित त्याचमुळे मी तगलो आणि सगळ्या संकटांना पुरून उरलो. प्रश्न : ‘चिठ्ठी आई है...’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. या गाण्याशी जुळलेली एखादी आठवण जाणून घ्यायला आवडेल? ‘चिठ्ठी आई है...’ या गाण्याशी जुळलेल्या इतक्या आठवणी आहेत, की मी त्यावर एक वेगळे पुस्तक लिहू शकेन. पण एक आठवण सांगितलीच पाहिजे. अभिनेता राजेंद्रकुमार यांनी हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. एक दिवस मला त्यांचा फोन आला. तुला माझ्या चित्रपटात अभिनय करायचा आहे, असे ते मला म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर हो म्हणावे की नाही, हेच मला कळत नव्हते. कारण अभिनय म्हटल्यावर मला दरदरून घाम फुटला होता. फोन करतो, म्हणून मी त्या वेळी वेळ मारून नेली. पण जाणीवपूर्वक फोन करणे टाळले. यानंतर काही दिवसांनी राजेंद्रकुमार यांनी माझ्या मोठ्या भावाला फोन केला. तुझा लहान भाऊ पंकज अतिशय उद्धट आहे रे. तो मला फोन करणार होता आणि त्याने केलाच नाही, असे त्यांनी माझ्या भावाला सांगितले. हा निरोप माझ्यापर्यंत पोहोचला आणि मग मी मोठ्या हिमतीने सगळी हिंमत करून राजेंद्रकुमार यांना फोन केला.मग कुठे, या गाण्यामागची पार्श्वभूमी त्यांनी मला समजावून सांगितली. तू चित्रपटात पंकज उधास म्हणूनच दिसशील, असे त्यांनी मला सांगितले आणि मी हे गाणे केले. प्रश्न : बॉलिवूडमध्ये संगीताचे महत्त्व शून्य झाले आहे, हे आपलेच शब्द आहेत. काय सांगाल? एकेकाळी चित्रपटात आठ-आठ गाणी असायची. अलीकडच्या चित्रपटात दोन-तीन गाणी खूप झालीत. बॉलिवूडमधील पार्श्वगायनाची परंपराच पूर्णपणे बदलली आहे. माझ्या मते, याचे मुख्य कारण आजचे चित्रपट आहे. ज्या प्रकारचे चित्रपट आज बनत आहेत, त्यात संगीतासाठी फार काही जागाच नाही. प्रश्न : पॉप, रिमिक्सच्या या युगात नवी पिढी गझलकडे कशी बघतेय? आपला अनुभव काय? माझ्या मते, नवी पिढी गझलमध्ये इंटरेस्ट घेतेय, हाच माझा अनुभव आहे. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हजारो यंगस्टर्स पुढे बसलेले मी पाहतो. खरे तर सगळे काही ऐकल्यानंतर माणसाला जेव्हा उबग येतो, त्याला शांती हवी असते, तेव्हा तो गझलकडेच वळतो. याला नवी पिढीही अपवाद नाही. प्रश्न : आपल्याकडून येत्या काळात आम्हाला काय नवीन ऐकायला मिळणार आहे? गेल्याच आठवड्यात माझा ‘मदहोश’ नावाचा अल्बम रिलीज झाला. सध्या मी एका सिंगलवर काम करतोय. हे सिंगल श्रोत्यांना आवडेल, अशी आशा आहे.

Web Title: When everything is boring, the ghazal seems so close

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.