मुंबईत आले तेव्हा...पाेलीस दादांमुळे सुखरुप घरी पाेहाेचले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 07:38 AM2022-07-10T07:38:50+5:302022-07-10T07:39:16+5:30
"आभाळमायासाठी विचारणा झाली आहे. मग काय ऑडिशन दिली, निवड झाली. दैनंदिन मालिका असल्याने शूटिंगसाठी मुंबईत यावं लागलं. तेव्हा माहीत नव्हतं, की हेच आता आपलं कायमचं मुक्कामाचं शहर होणार आहे."
मुग्धा गोडबोले, अभिनेत्री
ण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून १९९८ मध्ये विज्ञान शाखेची पदवीधर झाल्यावर, पुढे शिकायचं की इतर काही, हे ठरत नव्हतं. माझ्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या सगळेच उच्चशिक्षित असल्याने स्वाभाविकच आईबाबांच्या माझ्याकडूनही तशाच अपेक्षा होत्या. पण मला माझं वेगळं आकाश निवडायचं होतं.
पुरुषोत्तम करंडक, राज्य नाट्य स्पर्धा यातला अभिनयाचा अनुभव गाठीशी होताच. त्यात अचानक संगीत कुलकर्णींच्या थरार या मालिकेसाठी माहितीतल्या व्यक्तीकडून मला विचारलं गेलं आणि पहिला दरवाजा उघडला. कामातून कामं मिळू लागली. एका मालिकेच्या शूटिंगसाठी रामोजी स्टुडिओमध्ये असताना घरून निरोप मिळाला, की आभाळमायासाठी विचारणा झाली आहे. मग काय ऑडिशन दिली, निवड झाली. दैनंदिन मालिका असल्याने शूटिंगसाठी मुंबईत यावं लागलं. तेव्हा माहीत नव्हतं, की हेच आता आपलं कायमचं मुक्कामाचं शहर होणार आहे.
१३ ऑगस्ट १९९९ या दिवशी मुंबईत माझं स्वागत ‘मुंबई बंद’ने झालं. पार्ले स्टेशनवरून विजयनगर सोसायटीमध्ये केवळ पोलीसदादांच्या सहकार्याने सुखरूप पोहोचू शकले. आम्ही काही जणी तिथे भाड्याने राहत असू. जवळ फारसे पैसेही नव्हते. केलेल्या कामाचे पैसे त्याकाळी लगेच मिळत नसत. माझ्यासारख्या डेक्कनवर सुखवस्तू कुटुंबात वाढलेल्या मुलीसाठी तो थोडासा खडतर काळ होता, पण त्यातही मजा होती. कारण हा माझा मार्ग मी निवडला होता, कोणी लादला नव्हता.
मी जिथे असते तिथली असते, विषय संपला. त्यामुळे मला इथल्या प्रवासाचा, गर्दीचा, वेगवान जीवनाचा त्रास झाला नाही. एकदा लोकलने शूटिंगला जाताना माझ्या शेजारी बसलेल्या बाईला जोरदार उलट्या झाल्या. त्यातून कीटकनाशकाचा वास येऊ लागला. मग इतर बायांनी पुढच्या स्टेशनवर ट्रेन थांबताच पोलिसांना बोलावून तिला मदत मिळवून दिली. मी मात्र ते बघून पार हादरून गेले होते. एकदा असंच कांदिवलीला उतरायचं म्हणून गोरेगावपासूनच पुढे सरकले तर गर्दीने मला मालाडलाच उतरवलं. असे काही अनुभव येत होते. पण खरं तर हे सर्व माझ्या मुंबईकर होण्याच्या प्रक्रियेतल्या प्रशिक्षणाचाच भाग होते ना.
मोबाइल फोन त्या काळी नव्हते. तेव्हा शेजारच्या पटवर्धन काकांकडे आमच्यासाठी बऱ्याचदा फोन येत, पण काकाकाकूंनी कधीही त्याचा त्रास झाल्याचं दाखवून दिलं नाही. घराबरोबरच मनाचीही कवाडं माझ्यासाठी उघडी ठेवणारी माणसं मला मुंबईत भेटली. मग मी मुंबई सोडण्याचा विचार तरी कसा करू?
शब्दांकन : तुषार श्रोत्री