... आणि कपिल शर्मा घुसला होता अनोळखी व्यक्तीच्या लग्नात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 06:30 AM2018-12-02T06:30:00+5:302018-12-02T06:30:02+5:30
कपिलने खूपच सुरेल एंट्री घेत, पहला पहला प्यार है या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या दरम्यान कपिलने त्याच्या महाविद्यालयीन दिवसातील एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते.
इंडियन आयडॉलच्या या सिझनला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस गाणी सादर करत आहेत. आता या स्पर्धेत खूपच कमी स्पर्धक शिल्लक राहिले असून या मधून कोण विजेता ठरतोय याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तसेच या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. या आठवड्यात कपिल शर्मा या कार्यक्रमाच्या सेटवर हजेरी लावणार आहे.
कपिल शर्माचे लग्न १२ डिसेंबरला होणार असून या लग्नाची सध्या जंगी तयारी सुरू आहे. आता इंडियन आयडॉलचे स्पर्धक या कार्यक्रमाच्या सेटवर कपिलची बॅचलर पार्टी साजरी करणार आहेत. कपिल शर्माचे लग्न आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील त्याचे पुनरागमन यासाठी इंडियन आयडॉल 10 च्या सेटवर त्याने नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे परीक्षक नेहा कक्कड, जावेद अली, विशाल दादलानी आणि सूत्रसंचालक मनिष पॉल यांच्यासह सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. कपिल शर्मा त्याच्या लग्नाबाबत फारच उत्साही आहे आणि लवकरच त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ देखील सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर परत येत असल्याने तो खूपच खूश आहे. कपिलने खूपच सुरेल एंट्री घेत, पहला पहला प्यार है या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. या कार्यक्रमाच्या दरम्यान कपिलने त्याच्या महाविद्यालयीन दिवसातील एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते. कपिल शर्माने सांगितले की, “आमच्या महाविद्यालयीन दिवसात मी माझ्या मित्रांबरोबर चविष्ट जेवण जेवण्यासाठी लग्नांमध्ये जायचो. एकदा एका काकांनी आम्हाला पकडले आणि माझ्या मित्राने त्या काकांना गोष्ट रचून सांगितली की, कॉलेज मेसमधील जेवण संपल्याने आम्हाला खायला काहीच नव्हते. हे ऐकल्यावर त्या काकांना खूपच वाईट वाटलं. खरं तर तोपर्यंत आमचं जेवण झालं होतं... पण त्या काकांनी आम्हाला परत जेवायला लावलं. आम्ही त्या दिवशी दुप्पट जेवलो आणि त्या लग्नात नाचलोसुद्धा. हा माझ्या आयुष्यातील अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही.”