Throwback : त्या दिवशी मिथुन चक्रवर्तीने राज कुमार यांची चांगलीच घमेंड जिरवली..., वाचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 08:00 AM2023-04-15T08:00:00+5:302023-04-15T08:00:01+5:30
Mithun Chakraborty Raajkumar : ‘बरखुरदार, अपने बाप से पूढना कौन हूं मैं...,’ असं सलमानला सुनावणारे, नाना पाटेकरांना ‘जाहिल’ म्हणणारे राजकुमार एक वेगळंच रसायन होतं. एकदा मिथून चक्रवर्ती यांनाही राजकुमार यांनी असंच डिवचलं होतं...
Mithun Chakraborty Raajkumar : पडद्यावर राजकुमार यांचा वेगळाच रूबाब होता. खऱ्या आयुष्यातही त्यांचा तेवढाच रूबाब होता. त्यांच्या अॅटिट्यूडचे चिक्कार किस्से ऐकताना आजही अनेकजण थक्क होतात. ‘बरखुरदार, अपने बाप से पूढना कौन हूं मैं...,’ असं सलमानला सुनावणारे, नाना पाटेकरांना ‘जाहिल’ म्हणणारे आणि मेरे लिए चाहे राजेंद्र कुमार हो, जीतेंद्र हो धर्मेन्द्र हो या फिर कोई बंदर हो, क्या फर्क पडता है. जानी के लिए सब बराबर है, म्हणत धर्मेन्द्र यांना डिवचणारे राजकुमार एक वेगळंच रसायन होतं. एकदा मिथून चक्रवर्ती यांनाही राजकुमार यांनी असंच डिवचलं होतं. पण मिथुन चक्रवर्ती यांनीही त्यांना जशास तसं उत्तर दिलं होतं.
मिथुन चक्रवर्ती यांनी एक काळ गाजवला. एकेकाळी ते तरूणाईच्या गळ्यातील ताईत होते. अर्थात इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना बराच मोठा संघर्ष करावा लागला. अनेक नकार, अपमान पचवावे लागलेत. हा किस्सा देखील मिथुन यांच्या स्ट्रगल काळातील आहे.
किस्सा आहे 1989 सालचा. 'गलियों का बादशाह' या सिनेमात राज कुमार लीड रोलमध्ये होते. सोबत हेमा मालिनी, पूनम ढिल्लो, स्मिता पाटील व अमृता सिंग अशी दमदार स्टारकास्ट होती. या सिनेमात मिथून यांना एक छोटीशी भूमिका मिळाली होती. रोल लहान होता, पण मोठ्या स्टार्ससोबत काम करायला मिळणार म्हणून मिथुन खूश्श होते.
त्या दिवशी राज कुमार सेटवर पोहोचले. शूटींग सुरू झालं आणि अचानक का कुणास ठाऊक राज कुमार यांनी शूटींग थांबवलं. राज कुमार तसेही लहरी... दिग्दर्शकाने त्यांना शूटींग थांबवण्यामागचं कारण विचारलं असता ते म्हणाले, रोल छोटा असला तरी यासाठी एखाद्या मुरलेल्या अभिनेत्याला घ्यायला हवं होतं. मन फिल्ममध्ये याने छोटी भूमिका केली होती, अशा स्ट्रग्लर्सना कशाला घेतलं चित्रपटात. राज कुमार कुणाबद्दल बोलत होते तर मिथुन यांच्याबद्दल.
हे ऐकून मिथुन यांचा राग अनावर झाला. ते तडक उठून राज कुमार यांच्याकडे गेलेत. तुम्ही ज्या स्ट्रगलरबद्दल बोलत आहात तो मीच..., असं मिथुन राज कुमार यांच्या पुढ्यात उभं राहून जरा आवेषात म्हणाले. यावर राजकुमार हसले आणि पुन्हा त्यांनी डिवचायला सुरूवात केली. अरे भाई, कहां आ गए... ॲक्टिंग कोई बच्चो का खेल नहीं..., असं त्यांनी हसत हसत मिथुन यांना सुनावलं. मिथुन यांनीही त्यांना जबरदस्त उत्तर दिलं. अभिनय लहान मुलांचा खेळ नाही, हे मला चांगलं ठाऊक आहे. पण तुम्ही बघाल, एकदिवस मी मोठा स्टार होईल..., असं मिथुन म्हणाले. तुम्ही तरूण कलाकारांना अशी वागणूक देत असाल तर भविष्यात क्वचितच कोणी तरूण कलाकार तुमच्यासोबत काम करेल..., असं म्हणून मिथून तिथून निघून गेले.
पुढे आणखी इंटरेस्टिंग घडलं. दिग्दर्शकाने 'गलियों का बादशाह'च्या पोस्टरमधून राज कुमार यांचा मोठा फोटो हटवून त्याजागी मिथुन यांचा फोटो लावला. सिनेमा चालला नाही, पण मिथुन चक्रवर्तीच्या नावावर सिनेमा खपला. हे कदाचित बॉलिवूडचं पहिलं पोस्टर असेल ज्यात गेस्ट अपीअरन्स देणाऱ्या कलाकाराचा लीड ॲक्टरपेक्षा मोठा फोटो होता.