Throwback: जेव्हा 16 वर्षांच्या पद्मिनी कोल्हापुरेनं सर्वांसमोर प्रिन्स चार्ल्सला ‘किस’ केलं...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 06:12 PM2022-09-11T18:12:23+5:302022-09-11T18:13:46+5:30
Padmini Kolhapure : साल होतं 1980 आणि यावर्षी प्रिन्स चार्ल्स भारताच्या दौऱ्यावर होते. भारतात आल्यावर काय तर या राजपुत्राला बॉलिवूड सिनेमाची शूटींग बघण्याची लहर आली. आता त्यांना कोण नाही म्हणणार?
Padmini Kolhapure Prince Charles Kiss: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्यानंतर आता शाही परिवाराची गादी प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे आली आहे. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स तृतीय यांना ब्रिटनचे नवे किंग घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांचा राज्याभिषेकही पार पडला. त्यामुळे आता ते किंग चार्ल्स नावानं ओळखले जाणार आहेत. कधीकाळी हेच किंग चार्ल्स पद्मिनी कोल्हापुरेच्या ‘किस’मुळे चर्चेत आले होते.
साल होतं 1980 आणि यावर्षी प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) भारताच्या दौऱ्यावर होते. भारतात आल्यावर काय तर या राजपुत्राला बॉलिवूड सिनेमाची शूटींग बघण्याची लहर आली. आता त्यांना कोण नाही म्हणणार? अधिका-यांची लागलीच लगबग सुरू झाली आणि प्रिन्स चार्ल्स आपल्या ताफ्यासोबत राजकमल स्टुडिओत पोहोचले. या स्टुडिओत पद्मिनी कोल्हापुरेच्या (Padmini Kolhapure) ‘आहिस्ता आहिस्ता’ या सिनेमाचं शूटींग सुरु होतं.
चार्ल्स आलेत म्हटल्यावर 16 वर्षांची पद्मिनी लगेच त्यांच्या स्वागतासाठी पोहोचल्या. आधी अभिनेत्री शशिकला यांनी प्रिन्स चार्ल्स यांचं कुंकुम तिलक लावून आरती ओवाळून स्वागत केलं आणि नंतर पद्मिनी स्वागतासाठी पुढे आली. प्रिन्स चार्ल्स यांनी तिच्या दिशेने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. इतका तरूण देखणा, रूबाबदार, शाही राजपुत्र आपल्यापुढे हस्तांदोलनासाठी हात करतोय या भावनेने पद्मिनी अगदी हरखून गेली. तिने त्यांचा हात हातात घेतला आणि पुढच्याच क्षणी त्यांच्या गालाचं चुंबन घेतलं. ही घटना इतकी अनपेक्षित होती की, सगळेच अवाक् झाले होते. फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात हा क्षण कैद झाला होता. साहजिकच 1980 साली ही मोठ्ठी ब्रेकिंग न्यूज होती. दुसऱ्या दिवशी तमात वृत्तपत्रांनी खमंग बातमी छापली होती.
त्या काळात भारतातल्या अभिनेत्रीने किस करणं फार काही सामान्य बाब नव्हती. अगदी सिनेमातही किसचा सीन आला की, दिग्दर्शक दोन फुलं दाखवून पुढे सरकायचे. अशात पद्मिनींनी चार्ल्सच्या गालावर किस केला म्हटल्यावर हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. प्रिन्स चार्ल्सचं तेव्हा लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे तर अगदी ब्रिटनमध्येही या प्रकरणाची चर्चा झाली होती.
खरं तर पद्मिनीची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. पण तेव्हा कुणालाच ते पचलं नव्हतं. साहजिकच ही ‘किस स्टोरी’ तिच्यासोबत चिकटली ती चिकटलीच.
पद्मिनीला मात्र आजही याचा पश्चाताप होतो. एका मुलाखतीत ती यावर बोलली होती. ‘त्या प्रकरणानंतर अनेक दिवस मला ऑकवर्ड फील व्हायचं. मी ब्रिटनला गेले तेव्हा अगदी इमिग्रेशन ऑफिसरने प्रिन्स चार्ल्सना किस करणारी तूच का? असं मला विचारलं होतं आणि ते ऐकून मला लाज वाटली होती, असं ती म्हणाली होती.