निहलानींमध्ये सुधारणा कधी होणार?

By Admin | Published: April 11, 2016 01:20 AM2016-04-11T01:20:34+5:302016-04-11T01:20:34+5:30

पहलाज निहलानी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून या संस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. ही संस्था लोकांच्या टिंगलटवाळीचा विषय बनली आहे. उलटसुलट काहीतरी पाऊल

When will Nihalani improve? | निहलानींमध्ये सुधारणा कधी होणार?

निहलानींमध्ये सुधारणा कधी होणार?

googlenewsNext

पहलाज निहलानी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून या संस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. ही संस्था लोकांच्या टिंगलटवाळीचा विषय बनली आहे. उलटसुलट काहीतरी पाऊल उचलून निहलानी एकतर वाद ओढवून घेतात किंवा मग हसे करून घेतात. ‘जंगलबुक’ या नव्या चित्रपटाबाबत असाच अनाहुत सल्ला देऊन त्यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत.
या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘जंगलबुक’ चित्रपटास प्रमाणपत्र जारी करताना सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट मुलांसाठी स्केरी म्हणजे भीतिदायक आहे, त्यामुळे मुलांनी तो आई-वडिलांसोबतच पाहायला हवा, असे सांगत त्याला यूए प्रमाणपत्र दिले. म्हणजेच, चित्रपटगृहात मुलांसोबत आई-वडिलांपैकी कोणीतरी एक असणे आवश्यक आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या या युक्तिवादाला मानसिक दिवाळखोरीचा नमुना म्हणू नये तर काय म्हणावे. ‘जंगलबुक’ हा बालचित्रपट असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. भारतात काही वर्षांपूर्वी टीव्हीवर लहान मुलांनी मोगलीवरील मालिका पाहिली आहे. तेव्हा मुले घाबरल्याची एकही तक्रार कानी नाही.
दुसरी बाब म्हणजे ज्या वयोगटातील मुलांना डोळ्यांसमोर ठेवून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे त्या वयाची मुले एकट्याने चित्रपट पाहायला जाण्याची शक्यताच नाही. मुलांच्या मागणीनंतरच आई-वडील त्यांना असा चित्रपट पाहण्यासाठी नेतात. ‘जंगलबुक’ हा थ्रीडी फॉर्मेटचा चित्रपट आहे. त्यामुळे थ्रीडीसाठी तयार करण्यात आलेले चष्मे घालूनच तो पाहिला जातो. थ्रीडी फॉर्मेटमुळे मुले हा चित्रपट पाहून घाबरतील, अशी शंका निहलानी यांना कशी आली कोणास ठाऊक? आताची लहान मुले भयंकर आवाजाचे व्हिडीओ गेम खेळतात. अशा काळात ‘जंगलबुक’ पाहून मुले घाबरून जातील हा निहलानी यांचा युक्तिवाद अजिबात रुचत नाही. निहलानी यांचा हा निर्णय म्हणजे सत्तेची नशा माणसाला कशी बेधुंद बनविते याचा नमुना आहे. ‘जंगलबुक’बाबत निहलानींच्या निर्णयावर हसणारी मंडळी सन्माननीय निहलानीजी तुमच्यात कधी सुधारणा होणार?, असा प्रश्न विचारत आहेत.

Web Title: When will Nihalani improve?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.