भल्याभल्या राजकारण्यांना तालावर नाचवणारी 'मिर्झापूर 3' मधील 'झरीना' नेमकी आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 03:58 PM2024-07-08T15:58:55+5:302024-07-08T15:59:23+5:30
'मिर्झापूर 3' मधील दिलखेचक अदांनी आणि हुशारीने सर्वांना घायाळ करणाऱ्या 'झरीना'बद्दल जाणून घ्या (mirzapur 3)
'मिर्झापूर 3' सीरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. आधीच्या दोन सीझनप्रमाणे या तिसऱ्या सीझनने सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. 'मिर्झापूर 3' मधील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडीच्या. कालीन भैय्या, गुड्डू पंडीत, शरद शुक्ला, गोलू, बीना भाभी, रॉबीन अशा सर्वच व्यक्तिरेखांनी पुन्हा एकदा 'मिर्झापूर 3' त्यांच्या अभिनयाने गाजवलंय. 'मिर्झापूर 3' मध्ये पुन्हा एकदा एका कॅरेक्टने प्रेक्षकांना घायाळ केलंय. ते म्हणजे झरीना. 'मिर्झापूर 3' मधील हुशार राजकारण्यांना स्वतःच्या तालावर नाचवणारी ही झरीना नेमकी आहे तरी कोण?
'मिर्झापूर 3' मधील झरीना नेमकी कोण?
मिर्झापूरच्या पहिल्या सीझनपासून ते यंदाच्या 'मिर्झापूर 3' मधील 'झरीना' या भूमिकेची चर्चा झाली. झरीनाची भूमिका साकारलीय अनंगशा बिस्वास या अभिनेत्रीने. २१ फेब्रुवारी १९९० रोजी कोलकाता येथे अनंगशा बिस्वासचा जन्म झाला. अनंगशा हिंदी आणि बंगाली चित्रपट उद्योगातील तिच्या कामासाठी ओळखली जाते. कोलकात्याच्या भवानीपूर एज्युकेशन सोसायटी कॉलेजमधून तिने डीग्रीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे ऑस्ट्रेलियन फिल्म अँड टेलिव्हिजन अकादमी (TAFTA) मध्ये तिने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. नंतर भारतात येऊन तिने सिनेमांमधून काम करण्यास सुरुवात केली.
'झरीना'ची फिल्मी कारकीर्द
मीडिया रिपोर्ट्सनुसार अनंगशाने बालकलाकार म्हणून सुधीर मिश्रा यांच्या 'खोया खोया चांद' सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. नंतर 'लव शव ते चिकन खुराना' मधील तिच्या छोट्या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळाली. अनंगशाने नसीरुद्दीन शाह आणि शेफाली शाह अशा दिग्गज कलाकारांसोबत रंगभूमीवर काम केलं. याशिवाय 'हॉस्टेज' आणि 'काला' या वेबसीरिजमध्ये तिने अभिनय केलाय.
'आश्चर्यचकित' आणि अदा शर्माच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'बस्तर: द नक्सल स्टोरी' या सिनेमात देखील ती दिसली आहे. अभिनयासोबतच अनंगशा एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना आणि शास्त्रीय गायिका देखील आहे. 'मिर्झापूर 3' मध्ये अनंगशावर एक आयटम सॉंग चित्रित करण्यात आलंय. याशिवाय तिने दिलेले बोल्ड सीन्स सुद्धा चर्चेत आहेत.