बॉक्स आॅफिस का राजा कौन?
By Admin | Published: August 14, 2016 03:40 AM2016-08-14T03:40:12+5:302016-08-14T03:40:12+5:30
बॉलीवूडचे सिनेमा कोटीची कोटी उड्डाणे करताहेत. सिनेमांनी शंभर कोटी, दोनशे कोटी, तीनशे कोटी कमाई करीत बॉक्स आॅफिसवरील सगळे रेकॉर्ड मोडीत काढल्याचं पाहायला
बॉलीवूडचे सिनेमा कोटीची कोटी उड्डाणे करताहेत. सिनेमांनी शंभर कोटी, दोनशे कोटी, तीनशे कोटी कमाई करीत बॉक्स आॅफिसवरील सगळे रेकॉर्ड मोडीत काढल्याचं पाहायला मिळते. मात्र, या रेकॉर्डब्रेक सिनेमांच्या यादीत सर्वाधिक भरणा हा बॉलीवूडच्या हिट चेहऱ्याच्या कलाकारांच्याच सिनेमांचा असल्याचे आजवर पाहायला मिळालेय. बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या काही प्रसिद्ध अभिनेता, अभिनेत्री बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डतोड कमाई करीत असल्याचे चित्र आहे. इतर कलाकारांच्या सिनेमांची कथा कितीही चांगली आणि दर्जेदार असली, तरी त्याला म्हणावे तसे यश मिळत नसल्याचे बॉलीवूडमध्ये पाहायला मिळते.
गेल्या अनेक वर्षांपासून या तिन्ही खानांनी रसिकांच्या मनावर अशी काही मोहिनी घातलीय की, त्यांचे सिनेमा पाहण्यासाठी रसिक अक्षरश: वेडे होतात. शाहरुख खानने तर रसिकांवर अशी काही जादू केलीय की, त्याला बॉलीवूडचा किंग, रोमान्सचा बादशाह अशी बिरुदावली दिली गेलीय. ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’पासून ते आजच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘फॅन’ असे एकाहून एक सिनेमा केवळ शाहरुखच्या नावावर हिट ठरलेत. अशीच काहीशी जादू दबंग सलमान खानचीही आहे. ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित करण्याचा धडाका लावलाय. त्यामुळे त्याचे फॅन्सही ईदप्रमाणेच सलमानच्या सिनेमाचीही आतुरतेने वाट बघत असतात. सलमानचा कोणताही सिनेमा असो, त्याची कथा काहीही असो, भाईजान सिनेमात आहे म्हटले की, त्याच्या फॅन्सची पावले आपसूकच सिनेमागृहाकडे वळतात. सलमानच्या ‘दबंग’, ‘दबंग-२’, ‘एक था टायगर’, ‘बॉडीगार्ड’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुल्तान’ अशा सिनेमांनी बॉक्स आॅफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे केलीत.
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचे सिनेमाही फक्त त्याच्या नावावर बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करीत असल्याचे पाहायला मिळालेय. आमीर खान वर्षातून एक सिनेमा करतो, त्यामुळे त्याच्या सिनेमाची चाहत्यांना बरीच उत्सुकता असते. आमीरच्या सिनेमात काहीतरी वेगळे असणार, यामुळे रसिकसुद्धा त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहतो. आमीरच्या गेल्या काही वर्षांतल्या सिनेमांनी हेच सिद्ध केलेय. ‘रंग दे बसंती’, ‘थ्री इडियट्स’, ‘तारे जमीं पर’, ‘गजनी’, ‘धूम-३’, ‘पीके’ अशा आमीरच्या सिनेमांना रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले.
ही तर झाली बॉक्स आॅफिसवर प्रसिद्ध चेहऱ्यांना मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाची एक बाजू. त्याच वेळी बॉलीवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत, ज्यांच्या सिनेमांची कथा दर्जेदार असते, त्यांचा अभिनयसुद्धा तितकाच सरस असतो. मात्र, तिकीट खिडकीवर या सिनेमांना म्हणावे तसे यश काही मिळत नाही. यात खिलाडी अक्षय कुमारच्या सिनेमाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अक्षयच्या सिनेमांची कथा चांगली असली, तरी अपवादाने त्याच्या सिनेमाने शंभर कोटी, दोनशे कोटींची कमाई केल्याचे पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांत अक्षयचे ‘राऊडी राठोड’, ‘ब्रदर्स’, ‘एअरलिफ्ट’, ‘बेबी’, ‘हाउसफुल्ल-३’ असे सिनेमा रूपेरी पडद्यावर आले. ते सिनेमा चाललेसुद्धा. मात्र, त्यांना बड्या स्टार्सच्या सिनेमांप्रमाणे तिकीट खिडकीवर यश मिळाले नाही. अभिनेत्रींबाबतही असेच काहीसे चित्र आहे. बॉलीवूडमध्ये सध्या प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ याच अभिनेत्रींची चलती आहे.
दिग्दर्शक संजय जाधवचे यावर काहीसे वेगळे मत आहे. ‘सलमान, शाहरुख किंवा मग आमीर हे स्टार बनण्याआधी एक कलाकारच होते. या कलाकारांनी आपल्या अभिनयाने रसिकांचा विश्वास संपादन केलाय. रसिकांचे मनोरंजन करून ते स्टारपदापर्यंत पोहोचलेत. या कलाकारांचे सिनेमा सुपरहिट ठरतात. कारण रसिकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास. या विश्वासापोटीच या तिन्ही खानांचे सिनेमा कथा नसले, तरी चालतात,’ असे संजय जाधवला वाटते.
दिग्दर्शिका समृद्धी पोरे - ‘सध्या नायकप्रधान सिनेमा चालतात. रसिकांना सध्या बौद्धिक मनोरंजनापेक्षा कंबरेखालील विनोद बघायला आवडतात. मात्र, या गोष्टीचा फटका चांगला सिनेमा, कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना बसतो. या खानचा सिनेमा ईदला, याचा दिवाळीला, तिसऱ्या खानचा ख्रिसमसला हे रसिकांच्या मनात अगदी फिट्ट केले जाते. भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करणारा ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा त्यातल्या त्यात चांगला होता. असे समाजात चांगले संदेश देणारे किंवा प्रबोधनात्मक सिनेमा यावेत आणि चालावेत,’ असे वाटते.
दिग्दर्शक सुजय डहाके - ‘सलमान, शाहरुख यांना त्याच त्या अंदाजात रसिकांना बघायला आवडते. त्यांनी रूपेरी पडद्यावर काहीही केलेले रसिकांना भावते. मात्र, त्यांनी काही वेगळे केले की, ते त्यांच्या फॅन्सना कदाचित आवडत नसावे. उदाहरणार्थ, शाहरुखचा ‘फॅन’ सिनेमा. यात त्याने वेगळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रसिकांनी ते साफ नाकारले. त्यामुळे हे दोन्ही स्टारसुद्धा त्यांच्या रसिकांना जे आवडते तेच करतात. यात चित्रपटसृष्टीचा दोष नसून, रसिकांची मानसिकता तशी झालीय. रसिकांना आमीर आवडतो. कारण दरवेळी त्याच्या भूमिकांमध्ये नावीन्य असते.’
- suvarna.jain@lokmat.com