महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत कोण मारणार बाजी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 10:09 PM2024-03-07T22:09:46+5:302024-03-07T22:10:05+5:30
अंतिम फेरीसाठी 'गालिब'सह दहा नाटकांची निवड
मुंबई : २०२३-२४ यावर्षी घेण्यात आलेल्या ३४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या निकालाची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी खालीलप्रमाणे दहा नाटकांची निवड करण्यात आलेली आहे. ३४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत एकूण २४ व्यावसायिक नाट्यसंस्थांनी प्रयोग सादर केले.
यातून अंतिम फेरीसाठी मल्हारचे 'गालिब', भद्रकाली प्रॉडक्शनचे 'माझ्या बायकोचा नवरा', सेवन स्टुडिओज आर्टचे 'जन्मवारी', अभिजात क्रिएशन्सचे 'चाणक्य', प्रग्यास किएशन्सचे '२१७ पद्मिनी धाम', सोनल प्रॉडक्शन्सचे 'जर तरची गोष्ट', माऊली प्रॉडकशन्सचे 'मी नथुराम गोडसे बोलतोय', भरत जाधव एंटरटेंमेन्टचे 'अस्तित्व', अष्टविनायकचे 'मर्डरवाले कुलकर्णी', भूमिका व सोहमचे 'यदा कदाचित रिटर्न्स' या नाटकांची निवड करण्यात आली आहे. प्रकाश निमकर, विजय टाकळे आणि प्रसाद ठोसर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सर्व नाट्यनिर्माते, कलाकार व तंत्रज्ञांचे अभिनंदन करत, भविष्यातही नाट्यनिर्माते व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.