शिल्पा शिरोडकर आणि नम्रता शिरोडकरमध्ये कोण आहे मोठी बहीण, वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 05:50 PM2020-02-25T17:50:54+5:302020-02-25T17:54:28+5:30
शिल्पा आणि नम्रता यांच्यात मोठी बहीण कोण हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो.
शिल्पा शिरोडकरने नव्वदीच्या दशकात भ्रष्टाचार, योद्धा, हम, आँखे, गोपी किशनसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. शिल्पा 2000 नंतर चित्रपटांपासून दूर गेली. पण 13 वर्षांनंतर ती अभिनय क्षेत्राकडे परतली. तिने एक मुठ्ठी आसमान या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने सिलसिला प्यार का या मालिकेत गेल्या वर्षी काम केले. या मालिकेतील तिच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. पण गेल्या काही वर्षांत शिल्पा इतकी बदलली आहे की, तिला ओळखणे देखील कठीण जात आहे.
शिल्पाने अनेक वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता. ती गेल्या अनेक वर्षांपासून दुबईत राहाते. तिच्या कमबॅकच्या निर्णयाविषयी तिने सांगितले की, 2000 मध्ये लग्न झाल्यानंतर मी आणि माझे पती जवळजवळ पाच वर्षं तरी वेगवेगळे राहात होतो. पण मी त्यानंतर दुबईत स्थायिक व्हायचा विचार केला. एक पत्नी, आई म्हणून मी माझे आयुष्य आनंदाने घालवत होते. पण काही काळानंतर मला काम पुन्हा करायचे असे वाटू लागले. अभिनयक्षेत्राची मला आठवण येत होती असे नाही. पण पुन्हा काम करायचे असे मी पक्के ठरवले होते. म्हणून मी काही मालिकांमध्ये काम केले.
राकेश नाथ त्यांचा मुलगा करण नाथला रि-लाँच करण्याचा विचार करत होते. त्याचवेळी मला या चित्रपटात काम करायचे आहे असे मी त्यांना कळवले. माझे त्यांच्यासोबत घरातल्यासारखे संबंध असल्याने मी या चित्रपटात कोणती भूमिका चांगल्याप्रकारे करू शकेन असे त्यांनी मला सुचवले आणि मी लगेचच चित्रपटासाठी होकार दिला. या चित्रपटाचे चित्रीकरण करताना एखाद्या पिकनिकसारखा अनुभव होता.
शिल्पा सध्या चांगल्या चित्रपटाच्या ऑफर्सची वाट पाहात आहे. याविषयी ती सांगते, सध्या चित्रपटसृष्टीत अनेक गोष्टी घडत आहेत. सगळेच अधिक प्रोफेशनल झाले आहेत. मी नवव्दीच्या दशकात दोन शिफ्ट करत असे. एकाच दिवशी एका स्टुडिओतून दुसऱ्या स्टुडिओत चित्रीकरणासाठी अक्षरशः पळत जात असे. पण आता गोष्टी बदललेल्या आहेत. मात्र इंडस्ट्रीचा पुन्हा एकदा भाग बनण्यासाठी मी खूश आहे. माझ्या वयाच्या कलाकारांना देखील खूप चांगल्या भूमिका ऑफर होत आहेत.
सुरुवातीच्या काळात काम करण्याच्या अनुभवाविषयी शिल्पा सांगते, माझ्या काळातील बहुधा मी एकच अभिनेत्री असेन जिला देव आनंद, दिलीप कुमार यांसारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली. राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली नसली तरी त्यांची भेट माझ्या आजही लक्षात आहे. मी माझ्या आईसोबत त्यांच्याकडे हिना या चित्रपटाच्या निमित्ताने गेली होती. मला पाहाताच ते म्हणाले, बॉबी या चित्रपटाच्यावेळी मी तुला पाहिले असते तर मी तुला नक्कीच त्या चित्रपटात घेतले असते. त्यांनी माझी दखल घेतली हीच गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची होती.
शिल्पाप्रमाणेच तिच्या मुलीला या क्षेत्रात करियर करायचे आहे का असे विचारले असता ती सांगते, सध्या तरी तिला या क्षेत्रात रस नाहीये. पण आमच्या अनेक पिढ्या याच क्षेत्रात असल्याने मी काहीही सांगू शकत नाही.
शिल्पाची आजी मिनाक्षी शिरोडकर तसेच बहीण नम्रता शिरोडकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक वर्षं शिल्पा ही नम्रताची मोठी बहीण आहे असेच लोक समजत होते. याविषयी ती सांगते, मी नम्रताच्या आधी चित्रपटसृष्टीत आले. तिच्याआधी मी लग्न केले. तिच्याआधी मी आई झाले. बहुधा या सगळ्या गोष्टींमुळे मला लोक तिची मोठी बहीण समजतात. आम्ही दोघी एकमेकांच्या खूपच जवळ आहोत. आमच्या आई-वडीलांचे निधन झाल्यानंतर तर आम्ही दोघी एकमेकींना प्रचंड जपतो. नम्रताचा नवरा महेश बाबूच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनाच्यावेळेस मी भारतात येण्याचा प्रयत्न करते.