-म्हणून बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना दुय्यम भूमिका मिळतात...! अशोक सराफांनी सांगितलं चक्रावून टाकणारं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 01:48 PM2021-06-27T13:48:27+5:302021-06-27T13:50:36+5:30
तब्बल तीन दशकांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या अशोक सराफ यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं. हिंदीमध्ये देखील त्यांनी काही सिनेमे केलेत. अर्थात बॉलिवूडमध्ये ते फार रमले नाहीत, याचं कारण त्यांनी सांगितलं.
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृृष्टीतील एक मोठं नाव. इतक्या वर्षांपासून अशोक सराफ (Ashok Saraf) सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या अशोक मामा यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं. बॉलिवूडमध्येही त्यांनी काही सिनेमे केलेत. अर्थात बॉलिवूडमध्ये ते फार रमले नाहीत, याचं कारण त्यांनी सांगितलं. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांच्या वाट्याला बहुतांश दुय्यम भूमिकाच येतात? यामागचंही कारण यानिमित्तानं अशोक सराफ यांनी सांगितलं.
सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी खास मुलाखत दिली. या मुलाखतीत अशोक सराफ यांनी आपल्या कारकिर्दीबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या.
दादा कोंडकेयांचा विलक्षण अट्टाहास
‘पांडू हवालदार’ दादा कोंडके यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता. याबद्दल त्यांनी सांगितलं.. ते म्हणाले, दादा कोंडके यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे, सेटवर मज्जा यायची. सेटवर तो माणूस सतत लाईव्ह असायचा. कुठल्याही संवादात शेवटचा शब्द हा माझाच असला पाहिजे, हा त्यांचा विलक्षण अट्टाहास असायचा. मुद्दाम नसेल, पण पंच लाईन त्यांचीच असायची. मला त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं, असं अशोक सराफ यांनी सांगितलं.
सचिनसोबत काम करण्याची वेगळीच मजा...
सचिन पिळगावकरसोबत मी खूप सिनेमे केलेत. त्याच्यासोबत काम करण्याची एक वेगळीच मजा आहे. त्याच्यासोबत काम करताना मी रिलॅक्स असतो. कारण त्याला अभिनयाची अत्यंत बारीक जाण आहे, असं अशोक सराफ यांनी या मुलाखतीत सांगितलं.
मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये दुय्यम भूमिकाच का मिळतात?
मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये दुय्यम भूमिकाच का मिळतात? असा प्रश्न एका चाहत्यानं त्यांना विचारला. यावर अशोक सराफ यांनी दिलेलं उत्तर लक्षवेधी ठरलं. ते म्हणाले, ‘मराठी चित्रपटसृष्टीत हिरोला चेहराच नाहीये. त्याला काम आहे. हिंदीत वेगळं आहे. हिंदींत आधी चेहरा बघतात. मराठी प्रेक्षक मराठी कलाकारांचा चेहरा बघत नाही, ते त्याच्या कामावर प्रेम करतात. तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुम्ही आमचे हिरो, हा मराठी चित्रपटसृष्टीतील पूर्वापार नियम आहे. मराठी प्रेक्षक अधिक सुजाण आहे. हिंदीत चेहºयाला महत्त्व आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या हिरो या व्याख्येत बसतच नाही. त्यामुळं मराठी कलाकारांना नेहमीच नोकर किंवा तत्सम दुय्यम रोल दिले जातात. अर्थात नाना पाटेकर, स्मिता पाटील, अमोल पालेकर यांसारखे काही कलाकार त्याला अपवाद आहेत. अनेक मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक स्वतंत्र जागा निर्माण केली आहे. अनेक मराठी नावांचा बॉलिवूडमध्ये आजही दरारा आहे, असं अशोक सराफ म्हणाले.
म्हणून बॉलिवूडमध्ये रमलो नाही...
हिंदीत माझा प्रवेश झाला तो अमोल पालेकरमुळे. त्यानं माझं नाव समोर केलं आणि मला ‘दामाद’ हा सिनेमा मिळाला. तिथून माझा बॉलिवूडमधला प्रवास सुरु झाला. पण बॉलिवूडमध्ये काम करण्यात मला फार रस नव्हताच. मराठी काम करण्याच समाधान मिळत होतं. मी काम करतोय ते लोकांना आवडतं, मग मी हिंदीत का काम करू? असा माझा विचार होता. त्यामुळं वेळ मिळाला तर मी हिंदी सिनेमा केला. हिंदी सिनेमांसाठी मी कधीच वेळ नाही काढला, असं त्यांनी सांगितलं.