Jaggu ani Juliet Marathi Movie : ‘जग्गू आणि ज्युलिएट’साठी अमेय आणि वैदेहीचीच निवड का केली? दिग्दर्शक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 04:57 PM2023-02-10T16:57:00+5:302023-02-10T16:58:46+5:30
Jaggu ani Juliet Marathi Movie : महेश लिमये दिग्दर्शित ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या सिनेमात अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) मुख्य भूमिकेत आहेत.
‘जग्गू आणि ज्युलिएट’ (Jaggu ani Juliet Marathi Movie ) हा मराठी सिनेमा आज रिलीज झालाये. या सिनेमाचा ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महेश लिमये दिग्दर्शित ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या सिनेमात अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) मुख्य भूमिकेत आहेत. अजय-अतुल यांचं संगीत ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. साहजिकच या सिनेमाची जबरदस्त क्रेझ आहे. पण या सिनेमासाठी अमेय आणि वैदेहीच का? हा प्रश्न तुम्हालाही पडला असावा. तर दिग्दर्शक महेश लिमये यांनी त्याचं उत्तर दिलं आहे.
लोकसत्ताला दिलेल्या एका खास मुलाखतीत महेश लिमये यांनी या चित्रपटासाठी अमेय व वैदेहीची निवड का केली, याचं कारण सांगितलं.
ते म्हणाले, अमेय अनेक अवार्ड शो होस्ट करत असताे आणि त्यावेळी तो काय काय धम्माल करत असतो. असाच एक शो बघून मी ओंकारला म्हणालेलाे, जो आमचा लाइन प्रोड्यूसर आहे की, यार, हा आपल्या कॅरेक्टरला न्याय देऊ शकतो. मग अमेयला आम्ही एकदा ऑफिसला बोलवून स्क्रिप्ट ऐकवली. त्यावेळी तो जे बोललेला ते मला अजूनही आठवतंय. हे खरंच काहीतरी वेगळं आहे. हे माझ्यासाठी काहीतरी नवीन असणार आहे. पुण्याबाहेरच्या रोलमध्ये पडून मी पहिल्यांदा असं काही करणार आहे, असं तो म्हणालेला. त्याच्यासाठी हे खूप मोठं आव्हान होतं.
वैदेहीबद्दलही असंच. आमच्या कास्टिंग डायरेक्टरला मी सिनेमाची स्टोरी मी ऐकवली होती. त्यांनी मला बऱ्याच मुलींचे फोटो दाखवले. वैदेहीचे काही फोटो पाहून मला जाणवलं की, यार या मुलीत काहीतरी वेगळं आहे. मग आम्ही तिचं आम्ही एक फोटोशूट केलं आणि त्यात मला तिचं कास्टिंग दिसायला लागलं. यानंतर दोन तीन महिने वैदेही व अमेयने प्रचंड मेहनत घेतली. वैदेहीने अमेरिकन स्टाईलचं इंग्लिश आणि अमेयने आगरी-कोळी भाषा शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी आपआपल्या भूमिकांसाठी प्रचंड अभ्यास केला. कसं असतं की, तुम्ही एखाद्या सिनेमासाठी कलाकारांना लॉक केलं आणि त्यांनी त्यांच्यात तुम्हाला तुमची कॅरेक्टर दिसू लागली की, मग पुढचं सगळं सोप्प होतं. मग तुम्हाला त्यांच्याकडून बेस्ट ते काढून घेणं एवढंच एक काम उरतं.