विजय देवरकोंडाने का विकला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड? 7 वर्षांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 11:35 AM2024-04-01T11:35:16+5:302024-04-01T11:35:41+5:30
मिळालेल्या पुरस्कारांचं विजय देवरकोंडा काय करतो माहितीये का?
भारतीय सिनेसृष्टीतील दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने (Vijay Deverakonda) आपल्या अभिनयाने आणि अनोख्या स्टाईलने सर्वांनाच प्रेमात पाडलंय. केवळ साऊथच नाही तर संपूर्ण भारतीय चाहते त्याच्या प्रेमात आहेत. त्याने 'कबीर सिंह', 'डिअर कॉम्रेड', 'गीता गोविंदम' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. विजय देवरकोंडा रातोरात तरुणींचा क्रश बनला. दरम्यान त्याने काही वर्षांपूर्वी आपला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड चक्क विकला होता. तेव्हा त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आता अखेर इतक्या वर्षांनी विजयने यामागचं सत्य उलगडलं आहे.
2016 साली आलेल्या 'पेली चूपुलु' सिनेमातून विजय देवरकोंडाने अभिनयात पदार्पण केलं. यानंतर 2017 साली आलेल्या 'कबीर सिंह' मधून तो लोकप्रिय झाला. या सिनेमासाठी त्याला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. नुकतंच Galatta Plus ला दिलेल्या मुलाखतीत विजयने पहिल्या फिल्मफेअर अवॉर्डबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "अवॉर्ड विकल्यानंतर जे पैसे आले ते मी दान केले. ही माझी आतापर्यंतची सर्वात चांगली आठवण आहे. अवॉर्ड विकून मला 25 लाख मिळाले होते जे मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दान केले होते."
तो पुढे म्हणाला, "मला आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांमध्ये काही अवॉर्ड माझ्या ऑफिसमध्ये आहेत. काही माझ्या आईने घरात ठेवले असतील. मला हेही माहित नाही की कोणते माझे आहेत आणि कोणते माझ्या भावाचे आहेत. काही मी कोणाला देऊनही टाकतो. त्यातला एक संदीप रेड्डी वांगालाही दिला. फिल्मफेअरने दिलेल्या पहिल्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचा मी लिलाव केला. यातून चांगले पैसे आले. घरी ठेवलेल्या एखाद्या दगडाच्या तुकड्यापेक्षा ही माझ्यासाठी चांगली आठवण आहे."
विजय देवरकोंडाचा आगामी 'द फॅमिली स्टार' 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याची आणि मृणाल ठाकूरची फ्रेश जोडी आहे. तसंच विजय सध्या रश्मिकासोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत असतो. याच मुलाखतीत आपल्या लग्नाविषयीच्या प्लॅनिंगवर विजय म्हणाला, 'मला लव्हमॅरेज करायचं आहे आणि बाबा व्हायचं आहे.' यामुळे पुन्हा एकदा त्याच्या रश्मिकाच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप दोघांनी याविषयी काहीच माहिती दिलेली नाही.