'तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस...,' सुबोध भावेची नितीन देसाईंसाठी भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 04:44 PM2023-08-02T16:44:44+5:302023-08-02T16:45:16+5:30
Subodh Bhave on Nitin Desai : नितीन देसाईंच्या निधनामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान आता सुबोध भावेने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी त्यांच्याच कर्जत येथील भव्यदिव्य स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. या वृत्तामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं असेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. नितीन देसाईंच्या निधनामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. कलाकार मंडळी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. दरम्यान सुबोध भावे(Subodh Bhave)ने इंस्टाग्रामवर श्रद्धांजली वाहिली आहे.
सुबोध भावेने इंस्टाग्रामवर नितीश देसाईंसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, प्रिय नितीन, तुझा बद्दल अभिमान आदर आणि प्रेम नेहमीच होतं आणि कायम राहील. पण तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस हा प्रश्न नेहमी छळत राहील. ज्या तणावातून तू जात असशील असा तणाव कोणाच्याही आयुष्यात न येवो. भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.कलाक्षेत्रातील तुझी जागा कोणीच भरून काढू शकत नाही. ओम शांती
नितीन चंद्रकांत देसाई सिनेविश्वातील सर्वात मोठे नाव. २००५ साली हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जतमध्ये उभारला. मराठी रसिकांना अभिमान वाटेल असा भव्य 'एनडी स्टुडिओ' त्यांनी सुरु केला. याठिकाणी अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांचं चित्रीकरण झाले आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचे कलादिग्दर्शन त्यांनी केले होते. 'परिंदा', 'डॉन', 'लगान', 'देवदास', 'जोधा अकबर', 'हम दिल दे चुके नम' अशा अनेक सिनेमांचे कला दिग्दर्शन त्यांनी केले. तर 'बालगंधर्व' सारख्या मराठी सिनेमाचंही कलादिग्दर्शन केले. 'देवदास','खामोशी' या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.