‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘केजीएफ 2’नं धुमाकूळ घातला मग ‘राधेश्याम’च का आपटला? प्रभासने सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:01 PM2022-04-19T12:01:08+5:302022-04-19T12:15:29+5:30
Radhe Shyam, Prabhas : साऊथच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असताना प्रभासच्या ‘राधेश्याम’ची अशी गत व्हावी, हे पाहून अनेकांना आश्चर्य सुद्धा वाटलं. ‘राधेश्याम’ बॉक्स ऑफिसवर अपयशी का ठरावा? असा प्रश्न अनेकांना पडला. आता खुद्द प्रभासने याचं उत्तर दिलं आहे.
‘बाहुबली’ या चित्रपटानंतर प्रभास (Prabhas) चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. ‘बाहुबली’नंतर कधी एकदा प्रभास नवा चित्रपट घेऊन येतो, असं चाहत्यांचा झालं होतं. पण ‘साहो’ आला, तो आपटला. नुकताच प्रभासचा ‘राधेश्याम’ (Radhe Shyam) आला, तो सुद्धा तितक्याच दणकून आपटला. पुष्पा, आरआरआर, केजीएफ 2 अशा साऊथच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असताना प्रभासच्या ‘राधेश्याम’ची अशी गत व्हावी, हे पाहून अनेकांना आश्चर्य सुद्धा वाटलं. ‘राधेश्याम’ बॉक्स ऑफिसवर अपयशी का ठरावा? असा प्रश्न अनेकांना पडला. आता खुद्द प्रभासने याचं उत्तर दिलं आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्रभास यावर बोलला. ‘राधेश्याम’ फ्लॉप होण्यामागचं कारण त्याने सांगितलं. तो म्हणाला, ‘कदाचित राधेश्याम प्रेक्षकांना आवडला नसावा. कदाचित चाहते माझ्या या चित्रपटाशी कनेक्टच होऊ शकले नाहीत. एस.एस. राजमौलींनी बाहुबलीद्वारे लार्जर दॅन लाईफ अशी माझी इमेज तयार केली आहे. कदाचित लोक मला त्याच इमेजमध्ये, तशाच भूमिकांमध्ये बघू इच्छितात. लोक टीव्हीवर राधेश्याम बघतील, तेव्हा त्यांना तो नक्की आवडेल, असं मला अजूनही वाटतं.’
दिग्दर्शक व निर्मात्यांवर दबाव...
बाहुबलीच्या यशाचा परिणाम प्रभासच्या अन्य सिनेमांवरही पडतोय, याबद्दल छेडलं असता तो म्हणाला, ‘हो, माझ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर एक वेगळा दबाव आहेच. त्यांच्या चित्रपटाला बाहुबलीसारखाचा प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा स्वाभाविक आहे. पण माझ्यावर तसला काहीही दबाव नाही. बाहुबलीसारखं प्रत्येक चित्रपटातून लोकांचं मनोरंजन करण्याचा माझा प्रयत्न आहे. राधेश्याम आपटला यामागे अनेक कारणं असू शकतात. कदाचित कोरोना महामारीमुळे किंवा स्क्रिप्टमधील काही त्रूटींमुळे हा चित्रपट लोकांच्या हृदयाला स्पर्श करू शकला नाही. कदाचित लोकांना मला अशा भूमिकेत बघायला आवडलं नसेल.’
‘राधेश्याम’ या चित्रपटात प्रभासने हस्तरेषाकाराची भूमिका साकारली आहे. पण खऱ्या आयुष्यात ज्योतिष्यशास्त्रावर त्याचा अजिबात विश्वा नाही. ‘माझा नशीबावर विश्वास आहे. पण ज्योतिष्य आणि हस्तरेषा यावर माझा विश्वास नाही. मी कधीही माझा हात कुणाला दाखवलेला नाही. हे शास्त्र आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, हे मला ठाऊक आहे. पण माझा यावर विश्वास नाही,’असंही प्रभास म्हणाला.