...तर भारताचा ब्रँड अॅम्बेसेडर होईन - सलमान
By Admin | Published: May 18, 2015 11:50 AM2015-05-18T11:50:13+5:302015-05-18T12:15:10+5:30
हिट अँड रनप्रकरणी जामीन मिळालेल्या सलमान खानने आता भारताचा ब्रँड अॅम्बेसेडर व्हायची तयारीही दर्शवली आहे.
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १८ - हिट अँड रनप्रकरणी जामीन मिळालेल्या सलमान खानला आता भारताचा ब्रँड अॅम्बेसेडर व्हायचे आहे. जम्मू काश्मीरचा ब्रँड अॅम्बेसेडर होणार का असा सवाल विचारला असता मला ब्रँड अॅम्बेसेडर व्हायचे असेल तर भारताचा होईन असे सूचक विधान त्याने केेले आहे.
सलमान खान सध्या जम्मू काश्मीरमध्ये बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून यादरम्यान सलमानने जामीन मिळाल्यावर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हिट अँड रनप्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी पाठिंबा देणारे चाहते व मित्रमंडळीचे सलमानने आभार मानले आहेत. सलमानने जम्मू काश्मीरचे ब्रँड अॅम्बेसेडर व्हावे यासाठी स्थानिक राज्य सरकारने अथक प्रयत्न केले होते. जम्मू काश्मीरविषयी विचारले असता सलमान म्हणतो, जम्मू खो-यात चित्रिकरण करण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे, आता मी एका चित्रपटाचे चित्रीकऱण केले असले तरी भविष्यात आणखी एका चित्रपटाचे चित्रीकरण याच राज्यात करीन असेही त्याने सांगितले.
जम्मू काश्मीरचा ब्रँड अॅम्बेसेडरविषयी विचारले असता सलमानने त्यावर थेट नकार देणे टाळले. एका राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर होण्यापेक्षा मला देशाचा ब्रँड अॅम्बेसेडर व्हायला जास्त आवडेल असेही सलमानने म्हटले आहे.