KBC मध्ये पाच करोड कमाई करणारा सुशील कुमार आता करतो हे काम, वाचून तुम्हाला वाटेल अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 05:04 PM2019-09-17T17:04:17+5:302019-09-17T17:12:25+5:30
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या पाचव्या सिझनमध्ये सुशील कुमारने 5 करोड रुपये जिंकले होते.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाने आजवर अनेकांचे आयुष्य बदलले आहे. या कार्यक्रमामुळे अनेकांना करोडपती व्हायची संधी दिली आहे. अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनपासूनच या कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या कार्यक्रमाचा 11 वा सिझन सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत असून या सिझनला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या पाचव्या सिझनमध्ये सुशील कुमारने 5 करोड रुपये जिंकले होते. टॅक्स कापल्यानंतर त्याला 3.6 करोड रुपये इतकी रक्कम मिळाली होती. सुशीलला इतकी मोठी रक्कम मिळाल्यानंतर त्या रक्कमचे त्याने काय केले हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्याबाबत बोलताना त्याने 2012 ला आयएएनएसला सांगितले होते की, मला पैसे मिळाल्यानंतर स्वतःचे घर घेण्याला मी पहिल्यांदा प्राधान्य दिले. मला माझ्या कुटुंबातील सगळ्यांसाठी एक मोठे घर घ्यायचे होते. त्यामुळे मी तीन मजली मोठे घर माझ्या कुटुंबियांसाठी बांधले. हे घर बांधायला काही महिन्यांचा अवधी लागला होता. आता माझे 19 जणांचे मोठे कुटुंब या मोठाल्या घरात राहाते.
हिंदूला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले होते की, मी घर बांधल्यानंतर मोतिहारीमध्ये माझ्या आईच्या नावावर काही जमीन घेतली. त्यानंतर माझे भाऊ आणि माझ्या काही नातेवाईकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली. सुशीलने त्यानंतर दिल्लीत कॅबचा व्यवसाय सुरू केला होता. तसेच काही दुकाने मोतिहारीमध्ये घेतली होती आणि शिल्लक राहिलेले पैसे बँकेत ठेवून त्यावर त्याला व्याज मिळत होते. या कार्यक्रमात येण्यापूर्वी सुशील एका ठिकाणी कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. आता तो कोटोवा गावातील मचरगावा पंचायतीच्या हद्दीतील 40 गरीब मुलांना शिकवतो. हे काम तो कोणतेही पैसे न घेता करतो. हे गाव त्याच्या घरापासून काही किमीवर आहे. तसेच तो एका सरकारी शाळेत शिक्षक आहे. त्याला महिन्याला 18 हजार रुपये पगार मिळतो असे एनडिटिव्हीने 2017 मध्ये त्यांच्या वृत्तात म्हटले होते.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या सुशील द बेटर इंडिया या अभियानाअंतर्गत झाडे लागवडीचे काम करतो. त्याने बिहारमध्ये या अभियानाअंतर्गत 70 हजार झाडे लावली आहेत. या अभियानात त्याच्यासोबत संपूर्ण टीम काम करत असून त्यांनी लावलेल्या झाडांची ते देखभाल देखील करतात. एखादे झाड कोमजले अथवा प्राण्याने खाल्ले तर तिथे पुन्हा झाड लावण्यात येते.