हिच्या धैर्याला सलाम ! आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यपने टॉपलेस होत दाखवली सर्जरीची जखम!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 10:18 AM2019-02-05T10:18:35+5:302019-02-05T10:20:59+5:30
‘बधाई हो’ आणि ‘अंधाधुन’ स्टार आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप गेल्या काही महिन्यांपासून ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. ताहिरा ज्या धैर्याने या आजाराचा सामना करतेय, ते सगळे कौतुकास्पद आहे.
‘बधाई हो’ आणि ‘अंधाधुन’ स्टार आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप गेल्या काही महिन्यांपासून ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. ताहिरा ज्या धैर्याने या आजाराचा सामना करतेय, ते सगळे कौतुकास्पद आहे. ताहिरा व आयुष्यमान दोघांनीही या आजाराला लपवले नाही तर उलट दोघेही खुलेपणाने यावर बोलले. कॅन्सरने तोंड वर काढल्यानंतर ताहिराने हार मानली नाही. काम सोडले नाही. केमोथेरपीने डोक्यावरचे केस गळले. ते लपवण्यासाठी तिने खोटे केस लावले नाहीत तर थेट मुंडण केले,अगदी मुंडण केलेल्या अवतारात ती लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवरही उतरली. यानंतर ताहिराने काय करावे तर, आपल्या सर्जरीची जखम दाखवणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. काल वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने टॉपलेस होत तिने आपला हा फोटो शेअर केला.
आज माझा दिवस आहे. तुम्हा सर्वांना हॅपी वर्ल्ड कॅन्सर डे. आशा करते, तुम्ही सगळे हा खास दिवस आपल्या पद्धतीने साजरा कराल आणि या आजारासंदर्भातील गैरसमज दूर कराल. मी सर्जरीने दिलेल्या जखमांचा आदरपूर्वक स्वीकार केला आहे. जगात काहीही सर्वोत्तम नाही. स्वत:ला आहात तसे स्वीकारण्यातचं खरा आनंद आहे. हे माझ्यासाठी कठीण आहे. पण हा फोटो शेअर करणे माझा निर्णय होता. मी माझा आजार नाही, तर या आजाराशी लढण्याची माझी इच्छाशक्ती दाखवू इच्छिते, ती सेलिब्रेट करू इच्छिते, असे ताहिराने लिहिले आहे. ताहिराची ही पोस्ट पाहून कुणालाही तिचा आदर वाटेल आणि प्रत्येक जण तिच्या धैर्याला सलाम करेल. कॅन्सरसारख्या आजाराशी लढताना तिने दाखवलेले धैर्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
लवकरच ताहिरा दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. आपल्या चित्रपटात तिने माधुरी दीक्षितला कास्ट केले आहे. लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे. ताहिरा एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला कॅन्सरचे निदान झाले होते. ताहिराच्या या कठिण काळात आयुष्यमान कायम तिची सपोर्ट सिस्टिम बनून राहिला.