ही वर्ल्ड कपची टीम सामन्यांसाठी नाही तर शूटिंगसाठी झाली युकेला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 01:08 PM2019-05-30T13:08:37+5:302019-05-30T13:17:50+5:30
वर्ल्ड कप सामन्यांना आजपासून सुरूवात होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा ‘८३’ सिनेमा चर्चेत आहे.'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. यात रणवीर सिंग कपील देव यांची भूमिका साकारणार आहे.दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची टीम नुकतीच पहिल्या शेड्युलच्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना झाले आहेत.
८३ चित्रपटाच्या टीमने शूटिंगसाठी लंडनला जाण्याआधी एक फोटो सेशन केले आहे. त्यावेळी सर्व कलाकार सहभागी झाले होते. हा फोटो शेअर करताना रणवीर सिंगने लिहिले की, 'कपिल के डेविल्स. याबरोबरच रणवीरने आपला एक फोटो शेअर करत म्हटले, अविस्मरणीय सिनेमॅटिक प्रवास सुरू करायला निघालो आहे.
मदनलाल यांचे पात्र हार्डी संधू आणि मोहिंदर अमरनाथच्या भूमिकेत साकिब सलीम पहायला मिळेल. १९८३च्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारीत या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करांच्या भूमिकेत, एमी ब्रिक बलविंदर संधूंच्या भूमिकेत, तमीळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत, चिराग पाटील संदीप पाटील यांच्या भूमिकेत, आदिनाथ कोठारे, दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवि शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैयद यांच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत.
८३ चित्रपटाचे पहिले शेड्यूल ग्लासगो, स्कॉटलँडमध्ये चित्रीत केले जाणार आहे. आता भारतीय क्रिकेट टीमचा पहिला वर्ल्डकप जिंकल्याचा हाच पराक्रम रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.
या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
मात्र हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल, २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.