या अभिनेत्रीला पहिल्याच चित्रपटाने मिळवून दिले ऑस्करचे नामांकन!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 03:30 PM2019-02-22T15:30:53+5:302019-02-22T15:33:11+5:30
यंदा अनेक चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आहे. पण यात एक खास मेक्सिकन चित्रपट आहे, त्याचे नाव आहे, ‘रोमा’.
सिनेसृष्टीतील सर्वात मोठा ऑस्कर पुरस्कार यंदा कोण पटकावणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या २४ फेबु्रवारीला ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा रंगणार आहे. खास बात म्हणजे, यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात होस्ट नाही तर परफॉर्मन्स होणार आहेत. ऑस्करच्या वेगवेगळ्या श्रेणीत नामांकन मिळवलेली पॉप स्टार लेडी गागा आणि ब्रेडली कपूर यांचे शानदार परफॉर्मन्स या सोहळ्याची शान वाढवणार आहेत. अनेक चित्रपट यंदा ऑस्करच्या शर्यतीत आहे. पण यात एक खास मेक्सिकन चित्रपट आहे, त्याचे नाव आहे, ‘रोमा’.
नेटफ्लिक्सवर असलेल्या या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये म्हणजे कृष्णधवल रूपात चित्रीत केला गेला आहे. या चित्रपटात कुठलाही मोठा स्टार नाही. मॅक्सिकोच्या एका मध्यवर्गीय कुटुंबात काम करणा-या ७० च्या दशकातील क्लियो नामक एका महिलेची ही कथा आहे. क्लियोचे हे पात्र साकारले आहे, यालित्जा अपारिको हिने.
याच यालित्जाला ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण यालित्जा अपारिकोचा हा पहिला चित्रपट आहे आणि तिच्या पहिल्याच चित्रपटाला एक नाही, दोन नाही तर तब्बल दहा नामांकने मिळाली आहेत.
‘रोमा’ हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. ७० च्या दशकातील राजकीय उलथापालथ, श्रीमंत-गरिबातील वाढती दरी असे अनेक कंगोरे यात दाखवले गेले आहेत. अल्फान्सो क्वारोन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यांनाही आॅस्करच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.