यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल: माझे पती सांगायचे... पण बदल काहीच नाही - रोहिणी हट्टंगडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 10:03 AM2023-12-23T10:03:11+5:302023-12-23T10:45:59+5:30
जे कलावंत मेहनतीने बसवलेल्या नाटकातून आपल्याला वेगळी अनुभूती देतात. त्यांना नाट्यगृहात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नाट्यगृहाविषयीच्या विधायक सूचना त्यांनी केल्या आहेत. मान्यवर कलावंत आपल्यासमोर त्यांची भूमिका मांडत आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलविषयी प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आपल्या भेटीला आल्या आहेत. आपणही 8108899877 या नंबरवरच्या व्हॉट्सॲपवर आपली प्रतिक्रिया देऊ शकता.
- रोहिणी हट्टंगडी, अभिनेत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आमचे ‘चारचौघी’ हे नाटक प्रेक्षकांना खूप आवडत आहे. माटुंग्यातील पूर्वीच्या यशवंत नाट्य मंदिर आणि आताच्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलामध्ये आजवर ‘चारचौघी’खेरीज बऱ्याच नाटकांचे प्रयोग केले आहेत. इथल्या प्रयोगाच्या अनेक आठवणी असल्या तरी काही समस्याही भेडसावतात. कलाकारांच्या दृष्टिकोनातून यशवंत नाट्य मंदिर तसे ओके आहे. इथे परफॅार्म करताना एक वेगळाच उत्साह असतो. प्रेक्षकही उत्स्फूर्त दाद देतात. विंगेमध्ये मोठी जागा असल्याने वावरताना कुठेही अडचण येत नाही. अकॅास्टिक्सही चांगले आहे. मेकअप रूम्स मोठ्या आहेत, पण स्त्री कलाकारांसाठी मेकअप रूमला ॲटॅच्ड स्वच्छतागृहाची सोय हवी. एका बाजूला मेकअप रूम आणि दुसऱ्या बाजूला स्वच्छतागृह असल्याने स्त्री कलाकारांना खूप अडचणी येतात. मेकअपपूर्वी नैसर्गिक विधी उरकावा लागतो. मेकअप रूममध्ये केवळ पडदा असल्याने कित्येकदा स्त्री कलाकारांसाठी ते गैरसोयीचे ठरते. तिथे पार्टिशनची गरज आहे.
आमच्या सुरुवातीच्या काळात फार कमी लोकांकडे गाड्या होत्या, पण आता मराठी माणसाकडे भरपूर गाड्या असल्याने नाटकाला आल्यावर गाडी कुठे पार्क करायची हा प्रश्न सतावतो. ‘यशवंत’मध्ये पार्किंगची सोय आहे, पण गर्दी झाल्यावर ती अपुरी पडते. मुंबईतील बऱ्याच नाट्यगृहांमधील पार्किंगचा मुद्दा त्रासदायक ठरतो. ‘यशवंत’ला खूपच कमी जागा आहे. तिथे अगोदरच शासनाच्या बऱ्याच गाड्या पार्क केलेल्या असतात. कलाकारांच्या गाड्या आल्यानंतर प्रेक्षकांना गाडी पार्क करायला जागाच नसते. कित्येकदा खाली जागा नसल्यास कलाकारांनाही वरच्या मोकळ्या जागेतच गाडी पार्क करावी लागते. लांबून आणि उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांसमोर रस्त्यावर गाडी पार्क करण्यावाचून पर्यायच उरत नाही.
सर्व नाट्यगृहांमध्ये लाईट्सची व्यवस्था एकसारखी नसते. लाईट्स लावण्याची व्यवस्था समोरच्या बाजूला असायला हवी, जी ‘यशवंत’मध्ये नाही. इथे दोन बाजूला लाईट्स लावाव्या लागतात. त्यामुळे रंगमंचावर वावरताना काही ठिकाणच्या मुव्हमेंट्स मिस होतात. मध्यंतरी वातानुकूलित यंत्रणेची खूप मोठी समस्या होती, पण लवकरच नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने ती समस्या दूर होईल.
सहा इंचांचीच पायरी हवी...
‘यशवंत’मध्ये फार कमी पायऱ्या आहेत, पण बाल्कनीत जाताना तसेच प्रेक्षकांना स्वच्छतागृहात जाताना पायऱ्या चढाव्याच लागतात.
मी आता सीनियर सिटिझन्सच्या दृष्टिकोनातून हे बोलतेय. बऱ्याच नाट्यगृहांमध्ये मोठमोठ्या पायऱ्या असल्याने ज्येष्ठांना प्रेक्षकांना त्या चढणे शक्य होत नाही.
माझे पती जयदेव म्हणायचे की, प्रत्येक नाट्यगृहात फूटपट्टी लावून सहा इंचांचीच पायरी ठेवायला हवी.
प्रेक्षकांच्या बोलक्या प्रतिक्रिया...
स्वच्छतागृहांमध्ये कमोड्सची व्यवस्था गरजेची आहे. वयोवृद्ध नागरिकच नव्हे, पण तरुण पिढीही इंडियन पद्धतीच्या टॅायलेट्सचा वापर करणे टाळत असल्याने त्याकडे लक्ष द्यायला हवे.
श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्येही पार्किंगचा प्रॅाब्लेम आहे. या दोन्ही नाट्यगृहांच्या मधल्या भागात वाहनतळ आहे, पण वयोवृद्ध प्रेक्षकांना वाहनतळापासून नाट्यगृहापर्यंत चालत जाणे जमत नाही.
डोअरकीपरना
प्रशिक्षण द्यायला हवे...
प्रेक्षकांसाठी यशवंत आरामदायक असले तरी पहिल्या रांगेतील खुर्च्या पायरीवर असल्याने कधी कधी ती पायरी लक्षात येत नाही आणि धडपडायला होते. अंधारात बसायला जाताना थोडा त्रास होतो. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना मार्ग दाखवण्याचे प्रशिक्षण डोअरकीपरनाही देणे गरजेचे आहे. सीट्सचा गोंधळ झाल्यास कलाकारांसोबतच प्रेक्षकांनाही व्यत्यय येतो.