पहिला सीझन गाजला तरीही 'ये काली काली आँखे'चा सीक्वल यायला वेळ का लागला? दिग्दर्शक म्हणतात-
By देवेंद्र जाधव | Published: November 14, 2024 01:18 PM2024-11-14T13:18:50+5:302024-11-14T13:20:15+5:30
'ये काली काली आँखे' या गाजलेल्या वेबसीरिजचा दुसरा सीझन यायला विलंब का लागला? याविषयी दिग्दर्शकाने खुलासा केला
'ये काली काली आँखे' वेबसीरिज २०२२ साली रिलीज झाली होती. या सीरिजला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. रहस्यमयी कथानक असलेली ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास यशस्वी झाली. प्रमुख कलाकारांचा अभिनय, संगीत, बोल्ड आणि बिनधास्त प्रसंग, हटके संवाद अशा गोष्टींमुळे 'ये काली काली आँखे' वेबसीरिजची चांगलीच चर्चा झाली. कालच 'ये काली काली आँखे'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला. पहिला सीझन सुपरहिट होऊनही दुसरा सीझन प्रेक्षकांसमोर यायला वेळ का लागला याविषयी सीरिजचे दिग्दर्शक सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी खुलासा केला.
सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खुलासा केला. 'ये काली काली आँखे'च्या पहिल्या सीझननंतर दुसरा सीझन रिलीज व्हायला जवळपास तीन वर्ष लागली आहेत. सिद्धार्थ म्हणाले, "लिखाणात थोडा वेळ लागला. पहिल्या सीझनमध्ये जे रहस्य अर्धवट सोडलं होतं त्यामुळेच लिहायला वेळ लागला. पहिल्या सीझननंतर दुसरा सीझन लिहिणं थोडं कठीण असतं. नवीन सीझनच्या कथानकातही प्रेक्षकांना गुंतवून ठेवायचं असतं. पहिल्या सीझनमध्ये संपलेली कहाणी पुन्हा पुढे घेऊन जाणं थोडं कठीण असतं."
सिद्धार्थ सेनगुप्ता पहिल्या सीझनप्रमाणे 'ये काली काली आँखे'च्या दुसऱ्या सीझनच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. पहिल्या सीझनमध्ये असलेले ताहिर राज भासीन, आँचल सिंग, सौरभ शुक्ला, श्वेता त्रिपाठी, अरुणोदय सिंग पुन्हा एकदा दुसऱ्या सीझनमध्ये काम करताना दिसणार आहेत. यांच्या जोडीला 'ये काली काली आँखे २'मध्ये अभिनेता गुरमीत चौधरी महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. २२ नोव्हेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होतेय.