कौटुंबिकतेकडून सामाजिकतेचा ‘यू टर्न’...!
By Admin | Published: May 14, 2017 01:17 AM2017-05-14T01:17:23+5:302017-05-14T01:17:23+5:30
एखाद्या कलाकृतीचा सीक्वेल तितक्याच किंवा त्याहून अधिक ताकदीचा असेलच
राज चिंचणकर
एखाद्या कलाकृतीचा सीक्वेल तितक्याच किंवा त्याहून अधिक ताकदीचा असेलच, असे छातीठोकपणे काही सांगता येत नाही. परंतु, ‘यू टर्न २’ या नाटकाने मात्र सीक्वेल करताना ही शक्यता मोडीत काढत अधिकाधिक चांगले ते देण्याचा केलेला प्रयत्न उत्तम जमून आला आहे. मुळातल्या ‘यू टर्न’ या नाटकाचा ‘यू टर्न २’ हा पुढचा भाग आहे आणि तोही तितक्याच टेचात मंचित करण्यात आला आहे.
रसिकांची नाडी अचूक ओळखत ‘यू टर्न’चे पूर्वसूत्र ‘यू टर्न २’ सादर करताना आधी मांडले जाते. साहजिकच, ज्यांनी मूळ ‘यू टर्न’ पाहिलेले नाही; त्यांचे काही अडत नाही. दुसरा भागही रसिक स्वतंत्रपणे अनुभवू शकतील, अशी रुजवात या नाटकाने मुळातच करून ठेवली आहे. ‘यू टर्न’मध्ये मुंबईस्थित मेजर सुधीर वैद्य यांनी ‘कंपॅनिअन’ पाहिजे अशा दिलेल्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून पुण्याच्या रमा गोखले त्यांच्याकडे वास्तव्यास येतात. मात्र मेजर यांची विवाहित मुलगी मधू, तसेच रमा यांचा परदेशी स्थायिक असलेला विवाहित मुलगा साहिल यांना ते पटत नाही. त्यामुळे मेजर वैद्य यांचा निरोप घेऊन रमा गोखले पुण्याला परततात आणि इथे ‘यू टर्न’वर पडदा पडतो.
नाटकाच्या दुसऱ्या भागात मात्र अगदी उलटे घडते. इथे मेजर वैद्य हे रमा गोखले यांच्या पुण्यातल्या घरी येतात. त्यांच्या अचानक उद्भवलेल्या आजारपणामुळे त्यांचा इथला मुक्काम वाढत जातो. या काळात त्यांची इथली ‘कंपॅनिअनशिप’ न पटल्याने या दोघांना संस्कृतिरक्षक म्हणवून घेणाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. हे नवे प्रकरण निर्माण झाले असतानाच, दोघांच्या मुलांचा त्यांच्या ‘कंपॅनिअनशिप’विषयीचा आक्षेप दरम्यानच्या काळात निकालात निघालेला असतो. परिणामी, हे नाट्य मेजर वैद्य व रमा गोखले यांच्यापुढे उभ्या ठाकलेल्या नव्या आव्हानांना तोंड देण्यात रंगते.
कौटुंबिकतेकडून सामाजिकतेकडे असा प्रवास ‘यू टर्न’ ते ‘यू टर्न २’ यात लेखक व दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांनी घडवून आणला आहे. अवघ्या दोन पात्रांत नाट्य उभे करताना जी काही कसरत करावी लागते, ती त्यांनी झकास केली आहे. नाटकाच्या पहिल्या संवादापासून यातले नाट्य गुंतवून ठेवते आणि नाटकात केवळ दोनच पात्रे आहेत, याचा विसर पडायला लावते. याचे श्रेय लेखक-दिग्दर्शकाला द्यावेच लागेल. हे नाट्य गुंफताना त्यांनी वर्तमानकालीन विविध विषयांना हात घातला आहे. आजचा समाज आधुनिक म्हणवला जात असला, तरी त्यातल्या ठाम रुजलेल्या विचारांना धक्का देत त्यांनी अचूक निशाणा साधला आहे. नाटकात कविवर्य ग्रेस आणि कवी सौमित्र यांच्या कवितांचा समावेश करत त्यांनी नात्यांचे भावबंधही योग्य तऱ्हेने उलगडले आहेत.
हे नाट्य सक्षमपणे उभे करण्यात कलावंतांचा मोठा हातभार आहे. गिरीश ओक (मेजर वैद्य) आणि इला भाटे (रमा गोखले) यांची यात जुळलेली केमिस्ट्री लाजवाब आहे. नाटकाच्या पहिल्या भागातही हीच जोडी होती; परंतु दुसऱ्या भागात तोचतोचपणा येऊ न देण्याची खबरदारी घेत या दोघांनी नाटकात आणलेला फ्रेशनेस महत्त्वाचा आहे. देहबोली, संवादफेक आणि सहजाभिनयाचे उत्तम उदाहरण कायम करत हे दोघेही या नाट्यात समरस झालेले दिसतात आणि रसिकांना या नाटकात खिळवून ठेवण्याची कामगिरीही चोख पार पाडतात.
नाटकात अधूनमधून करण्यात आलेला चित्रफितीचा वापरही खटकत नाही. नेहमीची चाकोरी मोडून काढत नेपथ्यकार राजन भिसे यांनी तिरका कोन घेत उभारलेले रमा गोखले यांचे घर वेगळेपणाची जाणीव करून देते. नाटकाच्या पहिल्या भागाप्रमाणेच हा भागही ‘सुप्रिया प्रॉडक्शन’ने रंगभूमीवर आणून यशस्वितेचे पुढचे पाऊल टाकले आहे. ज्यांनी मूळ "यू टर्न" नाटक पाहिलेले आहे; त्यांना ‘यू टर्न २’ अधिकच रंजक वाटेल. परंतु ज्यांनी ते पाहिलेले नाही; त्यांना हा भाग पाहताना काही गमावल्याची चुटपूट लागून राहत नाही; हेच या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.