लहानग्यांच्या भावनांचा मोठा कॅनव्हास
By Admin | Published: August 26, 2015 05:02 AM2015-08-26T05:02:48+5:302015-08-26T05:02:48+5:30
चित्रपट म्हटले, की विनोदी, हॉरर, अॅक्शन, सामाजिक प्रश्न हाताळणारे चित्रपटच प्रथम डोळ्यांसमोर येतात. पण यामध्ये गेली काही वर्षे एक गट मागे पडला होता, तो म्हणजे लहान मुलांचा.
चित्रपट म्हटले, की विनोदी, हॉरर, अॅक्शन, सामाजिक प्रश्न हाताळणारे चित्रपटच प्रथम डोळ्यांसमोर येतात. पण यामध्ये गेली काही वर्षे एक गट मागे पडला होता, तो म्हणजे लहान मुलांचा. लहान मुलांचेही एक वेगळेच भावविश्व असते, ज्यामध्ये या लहान मुलांचेच काहीसे निराळे, त्यांना येणाऱ्या समस्या असतात. पण त्याबद्दल कोणाशी बोलायचे किंवा आपल्या जगात कोणाला आणि कसे समाविष्ट करून घ्यायचे, हे त्यांना कळत नाही. मात्र गेल्या काही वर्षांत या लहान मुलांच्या विश्वाचे विविधांगी कंगोरे समाजासमोर यायला लागले ते जाणकार आणि संवेदनशील दिग्दर्शकांकडून.
१९५३ मध्ये प्रल्हाद अत्रेंनी पहिल्यांदा साने गुरुजींच्या जीवनावर आधारित श्यामची आई या चित्रपटाची निर्मिती केली. मात्र त्यानंतर विशेषकरून लहान मुलांवर चित्रपट असे निघालेच नाहीत. पण गेल्या १०-१२ वर्षांत हा विषयही चित्रपटांमध्ये मांडला जाऊ लागला. मित्र-मंडळींमधल्या गमतीजमती, घरच्या परिस्थितीची जाण ठेवून लहान वयातच मॅच्युअर झालेली मुलं, अपंगत्वावर मात करीत कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची जिद्द, मनातील विचारांचा कोलाहल, शाळेत होणारे प्रेम अशा अनेक विषयांमधून लहान मुलांची मने समजायला चित्रपट या माध्यमामुळे एक मदतच झाली. श्वास, पक पक पकाक, चिंटू, शाळा, बालक-पालक, टाइमपास, फँड्री, यलो, एलिझाबेथ एकादशी, किल्ला हे चित्रपट त्याचीच काही उदाहरणे. या चित्रपटांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचायचं म्हटलं तर हे विषय मांडले गेल्याने मुलांचे विचार समजून घेतले जाऊ लागले, लहान मूल म्हणजे त्याला काय कळतंय हा पारंपरिक समज मागे पडला. त्यामुळे मुलांचे मत जाणून घ्यायला पालकही प्राधान्य देऊ लागले. मुलांमधील समजूतदारपणा, त्यांच्यातील कोणतीही गोष्ट साध्य करून दाखवण्याची क्षमता, कोणतीही गोष्ट करण्यामागचा विचार हे समजून घेण्याचा एक वेगळा दृष्टिकोन समाजाला या चित्रपटांमुळे मिळाला. यामुळे पालक आणि पाल्य हे नाते हळूहळू मैत्रीच्या नात्यात बदलू लागले. या नाजूक विषयांचे चित्रपटांतून केलेले उत्कृष्ट सादरीकरण आणि समाजाची लहान मुलांबद्दल बदलत असलेली दृष्टी हे या चित्रपटांचं यशच म्हणावं लागेल.
लहान मुलांबरोबर काम करायला मला खूप आवडतं. त्यामुळे त्यांच्यासमवेत काम करताना मला काही आव्हान वाटत नाही आणि शूटिंगदरम्यान एखादी अडचण आलीच तरी ती फार मोठी वाटत नाही. उलट ही पुढची जनरेशन खूप स्मार्ट, वैचारिक तर आहेच; पण त्याबरोबरच संवेदनशीलही आहे. शूटिंगदरम्यान किंवा इतरही वेळेला मला लहान मुलांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात.
- अविनाश अरुण, दिग्दर्शक