'हवा येऊ द्या'चा घसरलेला दर्जा सुधारू; झी मराठीची 'लोकमत'ला ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 06:10 PM2018-02-12T18:10:55+5:302018-02-12T18:16:57+5:30

एकेकाळी लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक गाठणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या घसरलेल्या दर्जावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठत असताना, लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी एक खरमरीत पत्र लिहून झी मराठीच्या डोळ्यात अंजन घातलं आहे.

Zee assures to improve quality of their popular show Hawa Yeu Dya | 'हवा येऊ द्या'चा घसरलेला दर्जा सुधारू; झी मराठीची 'लोकमत'ला ग्वाही

'हवा येऊ द्या'चा घसरलेला दर्जा सुधारू; झी मराठीची 'लोकमत'ला ग्वाही

googlenewsNext

मुंबईः एकेकाळी लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक गाठणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या घसरलेल्या दर्जावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठत असताना, लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी एक खरमरीत पत्र लिहून झी मराठीच्या डोळ्यात अंजन घातलं आहे. या पत्राची गंभीर दखल वाहिनीने घेतली असून, या जगप्रसिद्ध कार्यक्रमाचा दर्जा सुधारण्याची ग्वाही दिली आहे.

अतुल कुलकर्णी यांनी लिहिलेलं पत्र 

'चला, हवा येऊ द्या, बघायचं बंद करू या...!' या मथळ्याखाली अतुल कुलकर्णी यांनी निलेश साबळे आणि टीमला पत्र लिहिलं होतं. परदेशवारी सुरू झाल्यापासून, विनोदाची खालावलेली पातळी, पुरुषांना साड्या नेसवून होत असलेला किळसवाणा प्रकार, वैचारिक दारिद्र्य आणि एकूणच थिल्लरपणावर त्यांनी ताशेरे ओढले होते. हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. फेसबुकवर लाइक्स, शेअर्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला, तर व्हॉट्स अॅपवरही वेगवेगळ्या ग्रूपमध्ये त्यावर चर्चा झाली. 

झी मराठीच्या प्रेक्षकांनी अतुल कुलकर्णी यांच्या मताशी सहमती दर्शवली. निलेश साबळे आणि त्यांच्या टीमने मराठी भाषेची आणि मराठी माणसाची शोभा करत जगभर फिरू नये, हा कार्यक्रम झी मराठीने बंद करावा, अशा तीव्र प्रतिक्रिया वाचकांनी - प्रेक्षकांनी व्यक्त केल्या. त्यामुळे या पत्राची दखल झी मराठीला घ्यावीच लागली. 

'तुमचा लेख मी वाचलाय. तो करेक्ट आहे हेच सांगण्यासाठी मी फोन केलाय. त्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये आणि तो अत्यंत योग्य आहे. आमच्याकडून किंवा अन्य बाकी कोणीही काही म्हणेल तुम्हाला, पण मी तुम्हाला फोन करणे मला योग्य वाटले... नकारात्मक प्रतिक्रियांची आम्हालाही जाणीव आहे. त्यात थोडा थोडा सुधार करण्याचे काम चालू आहे. येत्या बुधवारपासून आमचा ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू होतोय. त्यासाठीच मी स्वत: तिकडे चाललोय... आणि येत्या काही काळात तुम्हाला त्यात बदल झालेला दिसेल...', अशी ग्वाही झी मराठीचे प्रमुख निलेश मयेकर यांनी अतुल कुलकर्णी यांना फोनवरून दिली आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम पुन्हा आपल्याला हसवेल, निखळ मनोरंजन करेल, अशी आशा चाहत्यांनी बाळगायला हरकत नाही. 

Web Title: Zee assures to improve quality of their popular show Hawa Yeu Dya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.