थोडासा विचार करा की, चहा नसता तर आपलं आयुष्य कसं असतं? तुम्ही चहाप्रेमी असाल तर असा विचारही करवणार नाही. चहा नसता तर, सकाळचा नाश्ता, कामाच्या धावपळीतून घेतलेला टी ब्रेकही नसता. खरं तर चहा जगभरामध्ये पाण्यानंतर सर्वात जास्त पिण्यात येणारं पेय आहे. याचं नाव ऐकताच फ्रेश वाटू लागतं. जर मर्यादित प्रमाणात चहा घेतला तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. पण जर चहाचे सेवन जास्त केलं तर मात्र चहा आरोग्यासाठी घातक ठरतो. सध्या चहा अनेक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आढूळन येतो. त्यामध्ये ग्रीन टी, ब्लॅक टी आणि लेमन टीचा प्रामुख्याने समावेश होतो. पण तुम्ही कधी व्हाइट टी प्यायला आहे का? व्हाइट टीचे सेवन करणंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया व्हाइट टीचे फायदे...
(Image Credit : Reports Healthcare)
काय आहे व्हाइट टी?
व्हाइट टीमध्ये चहाची पानं केमेलिया सिनेन्सिस Camellia sinensis नावाच्या एका झाडाची असतात. या झाडाची हिरवी पान तोडली जातात. त्यानंतर यावर प्रक्रिया करण्यात येते. प्रोसेसिंगच्या वेगवेगळ्या प्रक्रियेनुसार, व्हाइट टी , येलो टी , चाइनीज ग्रीन टी , जॅपनीज ग्रीन टी, वूलोंग टी आणि ब्लॅक टी यांसारख्या वेगवेगळ्या चहांचे प्रकार तयार करण्यात येतात. प्रोसेसिंग केल्यामुळे ही चहाची पानं लगेच खराब होत नाहीत.
वजन कमी करण्यासाठी 'व्हाइट टी'
ब्लॅक किंवा ग्रीन टीच्या तुलनेत व्हाइट टी वजन कमी करण्यासाठी मदत करतं. दररोज याचे सेवन केल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते. यामध्ये कॅलरी कमी असतात. याव्यतिरिक्त यामध्ये अस्तित्वात असलेली पोषक तत्व शरीरातील फॅट्स बर्न करण्यासाठी मदत करतात.
फॅट्स वाढत नाहीत
व्हाइट टी प्रभावीपणे नवीन फॅट्सच्या पेशींची वाढ होण्यापासून रोखतो. ज्यांना एडिपोसाइट्स असं म्हटलं जातं. नवीन फॅट्सच्या पेशीं कमी झाल्याने वजनही वाढत नाही. व्हाइट टीला अॅन्टी-ओबेसिटी असंही म्हटलं जातं. हे शरीरामध्ये फॅट्स तयार होण्यापासून रोखतात.
मेटाबॉलिज्म होतं उत्तम
व्हाइट टीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट असतात जे आपल्या शरीराचं मेटाबॉलिज्म उत्तेजित करतं आणि अशाप्रकारे आपल्या शरीरातून अतिरिक्त फॅट्स बर्न करून वजन नियंत्रणात ठेवतं.
जास्त भूक लागत नाही
व्हाइट टीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि फायबर असतं. जे भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतो. तसेच भूकेवर नियंत्रण ठेवणारे हार्मोन्स नियंत्रणात ठेवतं. ज्यामुळे फूड क्रेविंग होत नाही.
फायबरचा उत्तम स्त्रोत
व्हाइट टीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे पोट बराच वेळ भरल्याप्रमाणे वाटतं. याव्यतिरिक्त फायबर असल्यामुळे तुम्हाला जंक फूड किंवा इतर फॅटी पदार्थांची क्रेविंग होत नाही.
टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.