- शुभा प्रभू साटम, खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक shubhaprabhusatam@gmail.com
सुवर्ण मंदिरात मत्था टेकून आशीर्वाद घेऊन भाविक सुखी, संतुष्ट होतात आणि मग भक्कम कुलचा रिचवून तृप्त. अमृतसरच्या या कुलच्याने आपल्या गावच्या सीमा कधीच पार करून जगभर ठसा उमटवला आहे. कुलचा पाहिल्यावर तुम्ही म्हणाल, हा तर आलू परोठा!! तर पूर्ण चूक. मराठी घरात जशी चपाती/घडीची पोळी/फुलका वेगवेगळे असतात तसाच हा पदार्थही.
भिजवून थोड्या आंबवलेल्या मैद्यात, कांदा, धणे, जिरे उकडलेला बटाटा आणि काही मसाले भरून ते तंदूरमध्ये खरपूस भाजले जातात. वरून मग शुद्ध लोणी किंवा बटर लेप लावून, मसाला/आचारी प्याज, लोणचे, लिंबू या त्रयीसोबत दिले जातात.आता ठेल्यावर तंदूर कसा? दोस्तों , ये इंडिया है!! हॉटेलची जागा असेल तर भट्टी अथवा शेगडीवर चक्क भक्कम कुकर उलटा ठेवून त्यावर कुलचे शेकवतात. प्रत्येक जागेवरील कूलचाची चव आगळी आणि सोबत दिले जाणारे जोडीदार पण. कुठे कांदा-टोमॅटो, कुठे लोणचे, तर कुठे पुदिना चटणी.
एक मोठा कुलचा खाऊन पोट तट्ट व्हायलाच हवे. पंजाब, दिल्ली इथे असणाऱ्या कुलचा गाड्या अमाप आहेत. वास्तविक मोठ्या हॉटेल्समध्येही कुलचे मिळतात, पण खरी मजा रस्त्यावर खाण्यात आहे आणि एक, या लुसलुशीत कुलच्यासोबत सॉस/केचप नसतो आणि दिला जात असला तरी मी अज्ञानात सुख मानेन!! आता असा अमृतसरी कुलचा कसा आला? तर उत्तर हे की, तुम्हाला आंबे खायचेत की कोयी मोजायच्यात? इतिहास काहीही असो, या कुलच्याला तोड नाही. शिष्ट, अखडू ब्रिटिश, अगडबंब पदार्थ आवडणारे अमेरिकन, अगदी कॅनडा, फ्रान्स या देशात पण कुलचाचा उल्लेख मोस्ट प्रीफर्ड इंडियन ब्रेड म्हणून होतो. आणि याची लज्जत बाहेर खाण्यात आहे. का ते मला माहीत नाही.
उगाच साध्या गोष्टी चिवडत बसू नका राव. पत्रावळीवर (अस्सल कुलचा यावरच) वाफळणारा, छान दरवळणारा कुलचा, बाजूला असणारे कांदा, लोणचे, चटणी या भक्कम जोडीदारासमवेत येणारा कुलचा नजरेने बघून त्याचा दरवळ घेत घेत खायला सुरुवात करा आणि खाऊन झाले की लस्सी प्यावी, की लिंबू सोडा की कडक चहा हे चवदार कोडे सोडवायच्या मार्गाला लागा..