-सारिका पूरकर-गुजराथीरसगुल्ला भारतातील गोडाच्या पदार्थामधील प्रमुख आणि लोकप्रिय पदार्थाच्या यादीतील अग्रक्रमाचं नाव. पनीरपासून बनणा-या, तोंडात घालताच विरघळणा-या या मऊ लुसलुशीत रसगुल्ल्यावरुन साधारण २०१५ पासून एक युद्धच छेडले गेलं होतं. ते होतं की रसगुल्ला मुळचा बंगालचा की ओडिशाचा? बंगालची सिग्नेचर डिश म्हणून रसगुल्ल्याची ओळख असली तरी ओडिसाचं म्हणणं होतं की रसगुल्लाचा उगम हा त्यांच्या प्रदेशातलाच. असो तूर्तास या युद्धात बंगालनं बाजी मारली आहे आणि रसगुल्ला हा भौगोलिक परंपरेनुसार बंगालचाच असल्याचा शिक्कामोर्तबही झाला आहे. वादाला बगल देवून तोंडाला पाणी आणणा-या या रसगुल्ल्याविषयीची रोचक माहिती वाचायला सगळ्यांनाच नक्की आवडेल म्हणून हे वाचा.
ओडिशाचा ऐतिहासिक संदर्भ
इतिहास तज्ज्ञानच्या मते ओडिसा (पुरी) मध्ये बनविला जाणारा खीर मोहन नावाचा पदार्थ हाच रसगुल्ल्याचा उगम आहे. जगन्नाथ मंदिरात लक्ष्मीला या रसगुल्ल्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा हजारो वर्षाची असल्याचे सांगितले जाते. भगवान जगन्नाथ पत्नी लक्ष्मीला बरोबर न घेताच ९ दिवसांच्या रथयात्रेला निथून गेल्याचा राग लक्ष्मी मातेला. त्यामुळे तिने जयविजर दार बंद करुन घेतलं. जगन्नाथ यात्रेवरुन परतले तेव्हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिला त्यांनी रसगुल्ले दिले. तेव्हापासून लक्ष्मीमातेला रसगुल्लांचा नैवेद्य दाखविला जातो. १२ व्या शतकापासून ही परंपरा ‘निलाद्री बिजे’ या नावानं ओळखली जाते. लोककथेनुसार सांगायचं झाल्यास भुवनेश्वरमधील पहाला या गावात पूर्वी मोठ्या प्रमाणात गोपालन होत होते. भरपूर दूधदुभते उपलब्ध असायचे. परंतु काहीवेळेस हे दूध नासले तर ते दूध फेकून दिले जात असे. जगन्नाथपुरी मंदिरातील एका पुजा-याने हे पाहिले आणि या ग्रामस्थांना दूध नासवून छेना अर्थात पनीर कसे तयार करावे, हे शिकवले. पुढे पनिरातून रसगुल्ले बनवले गेले आणि पहिला गाव छेना बाजार म्हणून प्रसिद्ध झाले.
बंगालचा संदर्भ
प्रिया लेन या बंगाली इतिहास अभ्यासिकेच्या मते १८ व्या शतकात ओडिसी आचारी मोठ्या संख्येनं बंगालमध्ये कामानिमित्त दाखल झाले होते. बंगाली कुटुंबामध्ये ते स्वयंपाकाचे काम करीत हा स्वयंपाक करताना अन्य ओडिया पदार्थांबरोबरच त्यांनी रसगुल्लेही तयार केले असावेत . अन्य एक शक्यता अशी वर्तविली जाते की, १९ व्या शतकात काही बंगाली बांधव पुरी येथे गेले असता त्यांनी रसगुल्ल्याची पाककृती पुन्हा बंगालमध्ये नेऊन तेथे लोकप्रिय केली असावी. १९६९ मध्ये कोलकत्त्यातील नोविनचंद्र दास यांनी प्रथम रसगुल्ला त्यांच्या मिठाईच्या दुकानात विक्रीस ठेवल्याचेही सांगण्यात येते. छेना आणि रवा एकत्रित करुन त्यांनी हा पदार्थ बनविला. परंतु ओडिसातील ओरिजनल रेसिपीला मॉडिफाय करुन हा पदार्थ तयार केल्याचे म्हटले जाते. फूड हिस्ट्री अभ्यासक प्रणव राय यांच्या मते दास यांनी रसगुल्ला बनवला नाही तर तो केवळ लोकप्रिय केला. बंगालमध्ये ब्राजामोईत यांनी पहिल्यांदा कोलकत्ता उच्च्च न्यायालयाजवळ १८९९ मध्ये रसगुल्ला विक्री केली.प्रतिदावा
ओडिसाचा दावा हाणून पाडताना हा प्रतिदावा करण्यात येतो की भारतात १७ व्या शतकापूर्वी चीज, पनीर बनत असल्याचे पुरावे आढळत नाहीत. पोर्तुगीजांनी चीज हा पदार्थ भारतात आणला. भारतात त्यापुर्वी फक्त खव्यापासून गोड पदार्थ बनत होते. त्यामुळे १२ व्या शतकात जगन्नाथपुरी मंदिरात रसगुल्ल्याचा नैवेद्य दाखवणं अशक्य झालं आहे. मंदिरात या काळात दाखविण्यात येणा-या ५६ भोग पदार्थांच्या यादीत रसगुल्ल्याचे नाव आढळत नसल्याचेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
रसगुल्ल्याचे मार्केटिंग
इतिहासाच्या जंजाळातून रसगुल्ल्याला काढून त्याला ग्लोबली फेमस करण्याचे पहिले श्रेय दिलं जातं ते नोबिनचंद्र दास यांचा मुलगा क्रिष्णा दास यांना. त्यांनी १९३० मध्ये रसगुल्ल्यांना डबाबंद पॅकमध्ये विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे रसगुल्ला बंगालपुरताच मर्यादित न राहता तो भारतभर, भारताबाहेर जाऊ शकला आणि प्रचंड लोकप्रियही झाला. आज भारत, पाकिस्तान, दक्षिण आशिया, बांगला देश, नेपाळ येथे रसगुल्ला पोहोचला आहे. इस्त्रो या संस्थेने तर अंतराळवीरांसाठी कोरडे रसगुल्ले देण्याचीही तयारी दाखवली होती.
विविध प्रकार
आज बंगाली मिठाईत रसगुल्ल्याचे विविध प्रकार पहायला मिळतात. दरम्यान ओडिसा रसगुल्ला हा मऊ आणि क्रिमी रंगाचा असतो तर बंगाली रसगुल्ला हा पांढराशुभ्र व रबरासारखा असतो पहाल रसगुल्ला देखील भारतात आजही खूप लोकप्रिय आहे. या व्यतिरिक्त बंगालमध्ये राजभोग (केसरचे मिश्रण भरुन बनवलेला), संत्र्याच्या स्वादाचा कमलाभोग हे रसगुल्ल्याचे प्रकार पहावयास मिळतात. बेक्ड रसगुल्ला हा मॉर्डन अवतारही सध्या प्रचलित झाला आहे. रसगुल्ल्याला बंगाली पदार्थ म्हणून घोषित केल्यानंतर ओडिसा मिल्क फेडरेशनने ‘छेना पांडा’ हा पारंपरिक पदार्थ लोकप्रिय करण्याचा मानस व्यक्त केलाय. ओडिसात छेना गाजा आणि छेना पौडा हे दोन पनीरपासून बनविण्यात येणारे पदार्थही खूप लोकप्रिय आहेत.