- माधुरी पेठकर.कोणताही पदार्थ करताना मनात धाकधूक असतेच की हा पदार्थ खाईपर्यंत चांगला राहिल ना? आता बाहेरून आणल्या जाणा-या कितीतरी पदार्थात पदार्थ टिकवणारे रासायनिक घटक अर्थात प्रिझर्व्हेटिव्ह असतात. त्यांच्यामुळे पदार्थ टिकतात. अशा पदार्थांबाबत काळजी नसते. पण असे कृत्रिम प्रिझर्व्हेटिव्ह आरोग्यास हानी पोहोचवतात. त्यामुळे जे पदार्थ घरी बनवलेले आहेत, जे कमी काळासाठी टिकवायचे आहे त्यांच्यात कृत्रिम प्रिझर्व्हेटिव्ह न टाकलेलेच बरे.खरंतर आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो त्यातले अनेक घटक हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करतात. लसूण, हिमालयीन मीठ, लाल तिखट, साखर, लिंबू, व्हिनेगर हे घटक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणूनच काम करतात. त्यामुळे आपण कोणता पदार्थ करतो आहोत, तो गोड, तिखट, नमकीन कसा आहे, तो किती दिवस टिकवायचा आहे याचा विचार करून नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह वापरले तर फायदाच होतो.नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह वापरून दिर्घकाळ टिकणारा पदार्थ म्हणजे लोणचं. लोणच्यामध्ये मीठ, लसूण, लवंग, गूळ, लाल तिखट असे घटक असल्यानं लोणचं महिनोनमहिने टिकतं. या एका उदाहरणावरून नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्हमध्ये किती ताकद असते हे लक्षात येतं.या नैसर्गिक घटकांमध्ये असं काय असतं जे पदार्थ टिकवून ठेवतात हे माहित करून घेणंही गरजेचं आहे. ते माहिती असलं की कशात कोणता घटक वापरला तर आपला पदार्थ टिकेल याचा आपला आपल्यालाच अंदाज येईल.
लसूण
लसणामध्ये अॅण्टि व्हायरल घटक असतात. हे घटक अन्नासोबतच शरीरातील अपायकारक जीवाणूंसोबत लढतात त्यांना रोखण्याचं काम करतात. त्यामुळेच अपण जर आपण सूप, डिप, सॅलड ड्रेसिंग अशा स्पेशल डिशेस बनवत असू तर त्यात आठवणीनं लसणाच्या कळ्या किंवा लसूण ठेचून घालायला हवा. यामुळे हे पदार्थ खूपवेळपर्यंत चांगले राहतात. या पदार्थांमधला ताजेपणा हे घटक टिकवून ठेवतात.हिमालयीन मीठ
मुळात मीठ हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह असतं. त्यात हिमालयीन मीठ हे प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरणं योग्य. भाज्या, आमट्या, पास्ता, सूप, ड्रेसिंग्ज, डिप्स, स्प्रेडस असा कोणताही पदार्थ करताना त्यावर हिमालयीन मीठ हे चिमूटभर भुरभुरलं तर पदार्थ दीर्घकाळपर्यंत ताजा राहातो आणि त्यांची पौष्टिकताही वाढते.
मोहरी, लाल तिखट
फोडणी देताना तेल तापलं की त्यात थोडे मोहरीचे दाणे टाकले जातात . ते काही चवीसाठी नाही. पदार्थ उशिरापर्यंत राहिला तरी तो उतरू नये हा त्यामागचा उद्देश असतो. अनेक पदार्थांमध्ये मस्टर्ड सॉस वापरलं जातं. पण त्यात काही प्रमाणात व्हिनेगर वापरलेलं असतं. लाल तिखट हे चवीसाठी आणि पदार्थ टिकवण्यासाठी महत्त्वाचं असतं. तसं पाहिलं तर मसाल्याचा प्रत्येक घटक हा जीवाणूंसोबत लढा देवून पदार्थ दिर्घकाळपर्यंत ताजा आणि चविष्ट ठेवतो. त्यामुळे आइस्क्रिमसारख्या थंड पदार्थांवरही थोडं लाल तिखट भुरभुरण्याची फॅशन आहे. यामुळे चवीत फरक पडतो आणि पदार्थ टिकतोही.
लिंबू
लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सायट्रिक अॅसिड असतं. हे अॅसिड पदार्थ टिकवून ठेवण्यात मोठी भूमिका पार पाडतं. लिंबाच्या सालीत आणि रसात पदार्थ टिकवून ठेवण्याची मोठी ताकद असते. लिंबू गार किंवा गरम पदार्थामध्ये पिळून टाकलं तर पदार्थ पुष्कळ वेळापर्यंत ताजा आणि चविष्ट राहातो.
व्हिनेगर
व्हिनेगर हे साखर आणि पाणी वापरून बनवलेलं असतं. व्हिनेगरमध्ये अॅसेटिक अॅसिड असतं. जे पदार्थातील अतिसूक्ष्म जीवाणूंसोबत लढा देतं. रोजच्या पदार्थांमध्ये थोडं साधं व्हिनेगर घातलं तर पदार्थ टिकून तर राहातोच शिवाय त्याची चवही वाढते.साखरसाखर ही अतिरिक्त पाणी शोषून घेण्यास मदत करते. पदार्थाला पाणी सूटून त्यात शरीरास हानिकारक जीवाणू वाढण्याची शक्यता असते. साखरेच्या वापरामुळे अशा जीवाणूंची वाढ होत नाही.