माधुरी पेठकरमीठ एक जीवनावश्यक घटक. मीठाशिवाय पदार्थ हा विचार करणंही शक्य नाही. पण अनेकांना प्रमाणापेक्षा मीठ जास्त खाण्याची सवय असते. कोणी मूळ पदार्थच थोडा खारट करतात तर अनेकजण चव आली नाही की वरून घेवून मीठ खातात. कुशल स्वयंपाकी, आहारतज्ञ्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक आणि संशोधक मीठाचं महत्त्व मान्य करूनही आहारात मीठाचं प्रमाण प्रमाणशीरच असायला हवं यावर भर देतात.मीठावर झालेले अनेक संशोधनं आणि अभ्यास मीठ जास्त खाल्ल्यास काय दुष्परिणाम होतात, शरीरात नेमकं काय विपरित आणि अनैसर्गिक घडतं हे सांगत आहे. लंडनमध्ये मीठाच्या बाबतीत नुकताच एक अभ्यास करण्यात आला. त्यात जास्त मीठ सेवन केल्यास तहान कमी होवून भूक वाढते. असं म्हटलं आहे. शरीरात अनावश्यक पाणी केवळ मीठाच्या अतिप्रमाणामुळे साठून राहातं. आहारातील मीठाचं जास्त प्रमाण किडनीच्या कामावर वाईट परिणाम करतं.हा अभ्यास किंवा खरंतर कोणताच अभ्यास, संशोधन, डॉक्टर किंवा आहारतज्ञ्ज्ञ मीठ खाऊ नका असं म्हणत नाही. पण मीठ कमी प्रमाणात खाल्लं तर शरीरावर अती मीठाचे परिणाम होणार नाही. अती मीठ खाल्ल्याचे दुष्परिणाम वाचले तर कदाचित तुमची जास्तीचं मीठ खाण्याची सवय नक्की कमी होईल.
अती मीठाचे दुष्परिणाम1) अती प्रमाणात मीठ खाल्ल्यास प्रसंगी मृत्यूही ओढावतो. पोटाचा कर्करोग, स्मृतीभ्रंश, अती लठ्ठपणा, आॅस्टोपोरोसिस, मूतखडे आणि किडनीचे इतर गंभीर आजारांचं मूळ मीठ खाण्याच्या प्रमाणात असतं.2) ब्रेन स्ट्रोकच्या कारणांमध्येही मीठाचं अतीप्रमाण हे कारण सांगितलं जातं. उच्च रक्तदाबामुळे ब्रेन स्ट्रोक येतो. या उच्च रक्तदाबाचं कारण अती प्रमाणात खाल्लेलं मीठ हे असतं.
हे सर्व आजार टाळून सुरक्षित आणि आनंदी जगायचं असेल तर मीठ कमी खायला हवं असं आपण आपल्यालाच बजावायला हवं !