(Image Credit : mnn.com)
सर्वच घरांमध्ये आढळून येणारा एक सामान्य पदार्थ म्हणजे, मध. खरं तर चवीला गोड असणारी ही मध आरोग्यासाठीही अगदी फायदेशीर ठरते. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. आयुर्वेदामध्येही मधाचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही मध गुणकारी ठरतं. अनेकजण वजन कमी करण्यासाठीही मधाचा वापर करतात. अनेक गोष्टींवर गुणकारी ठरणारं मध शरीराला उर्जा देण्यासाठी मदत करतं. पण तुम्हाला माहित आहे का? मध अनेक गोष्टींवर गुणकारी ठरतं असलं तरि काही पदार्थांसोबत याचं सेवन करणं टाळावं. अन्थथा शरीरासाठी हे घातक ठरू शकतं. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, मधाचं सेवन करताना काही पदार्थांसोबत खाणं टाळणं आवश्यक असतं.
- मध हा उष्ण पदार्थ आहे. त्यामुळे इतर असे पदार्थ जे निसर्गतः गरम असतात त्यांच्यासोबत मधाचे सेवन करणं शक्यतो टाळावं. अन्यथा शरीराचं तापमान वाढू शकतं आणि उष्णता जणवू शकते.
- चहा किंवा कॉफीसोबत मधाचं सेवन करणं शक्यतो टाळा. असं केल्याने शरीराचं तापमान वाढू शकतं. यामुळे अस्वस्थता जाणवू शकते.
- मधामध्ये उष्णता अधिक असल्याने उन्हाळ्यामध्ये शक्यतो त्याचे सेवन करणं टाळावं.
- मधासोबत मुळा खाऊ नका. त्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार होतात.
- मांस आणि मासे यांसोबत मध खाल्याने शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार होतात. ज्यामुंळे शरीरावर वाईट परिणामम दिसून येतात.
- तूप आणि मध समप्रमाणातच खा, अन्यथा शरीरासाठी ते घातक असू शकतं. असं न करणं शरीरासाठी घातक ठरू शकतो.
जाणून घ्या मधाचे आरोग्यदायी फायदे :
शरीराला मिळते ऊर्जा
मधातील ग्लुकोज शरीर लगेचच शोषून घेते. ज्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते. शिवाय,व्यायाम करण्यापूर्वीही अर्धा चमचा मधाचे सेवन करावे, यामुळे थकवा जाणवत नाही. चहा-कॉफीमध्ये साखरऐवजी मधाचा वापर करावा.
खोकल्यावर फायदेशीर
नियमित दोन चमचे मध खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. मधामध्ये अॅन्टी मायक्रोव्हियल गुण असल्यानं यामुळे संसर्ग पसरवणाऱ्या जिवाणूंचाही खात्मा होतो.
हृदविकारांचा धोका कमी होतो
आरोग्य तज्ञ्जांनुसार मधाचे सेवन केल्यास रक्तामध्ये पॉलिफोनिक अँटी-ऑक्सिडेंट्सचा स्तर वाढवतो, यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
चांगली झोप मिळते
मधातून सेरोटोनिन रसायन निघते, यामुळे आपली मनःस्थिती चांगली राहण्यास मदत मिळते. मधातील सेरोटोनिन रसायन शरीर मेलाटोनिन रसायनात बदलते, यामुळे झोप चांगली मिळते. अपुऱ्या झोपेचा त्रास सतावत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात मध मिसळून प्यावे. यामुळे चांगली झोप येईल.
रोगप्रतिकारकशक्ती वाढते
अॅन्टी-ऑक्सिडेंट आणि अॅन्टी बॅक्टिरिअल गुणांमुळे मधाचे सेवन शरीरास आरोग्यदायी आणि पोषक ठरते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध आणि लिंबूचा रस एकत्र करुन प्यावे.
रक्तदाब नियंत्रणात राहतो
नियमित एक चमचा मध किंवा गरम पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.