Soaked Cashew Benefits : ड्रायफूट्स सेवन करण्याचे आरोग्याला किती फायदे मिळतात हे एक्सपर्ट नेहमीच सांगत असतात. लोक ड्रायफ्रूट्सचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करतात. कुणी थेट ड्रायफ्रूट्स खातात किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये त्यांचा समावेश करतात. बदाम आणि काजूंचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. पण अनेकांना त्यांच्या सेवनाची योग्य पद्धत माहीत नसते. बदाम भिजवून खाण्याचे फायदे अनेकांना माहीत असतात, पण काजू फार कुणी भिजवून खात नाहीत. त्याचेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काजूमध्ये फायबर, प्रोटीन, मॅगनीज, झिंक, कॉपरसारखे पोषक तत्व भरपूर असतात. यांद्वारे शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. काजूंचा रोज आहारात समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. अशात सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले काजू खाण्याचे काय फायदे असतात हे जाणून घेऊया.
भिजवलेले काजू खाण्याचे फायदे
- आजकाल लोकांना वेगवेगळ्या कारणांनी शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या होत असते. अशात जर तुम्ही काजूचं नियमितपणे सेवन केलं तर शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास तुम्हाला मदत मिळू शकते. तसेच यात भरपूर प्रमाणात प्रोटीनही असतं ज्यामुळे शरीरात ऊर्जा मिळते. इतकंच नाही तर याच्या सेवनाने शरीरात रक्तही वाढतं.
- काजू हृदयासाठी फार फायदेशीर मानले जातात. कारण यात मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅट्स असतं. जे हृदयासाठी गरजेचं असतं.
- तसेच काजूचं सेवन केल्याने त्वचेलाही अनेक फायदे मिळतात. याने त्वचा चमकदार होते. तसेच यातील प्रोटीनच्या मदतीने केसही मजबूत होण्यास मदत मिळते.
- काजूमध्ये व्हिटॅमिन बी सुद्धा असतं. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती मजबूत होते. त्यामुळे लहान मुलांनाही कमी प्रमाणात तुम्ही काजू देऊ शकता.
- काजूमध्ये कॅल्शिअम असल्याने हाडं मजबूत होण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर अनेक रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, काजूमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासूनही बचाव होतो. काजूमुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखली जाते.
- तसेच काजू डोळ्यांसाठीही फायदेशीर मानले जातात. यातील जियेक्सॅंथिन आणि ल्यूटिनसारखे कॅरोटिनॉइड्स आढळतात जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करतात.
एका दिवसात किती काजू खावेत?
बरेच लोक टेस्टच्या नादात आणि जास्त फायदे मिळावे म्हणून एकाच दिवशी भरपूर काजू खातात. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. एक्सपर्ट सांगतात की, एका वयस्क व्यक्तीने दिवसभरातून ५ पेक्षा जास्त काजूचं सेवन करू नये. यापेक्षा जास्त काजू खाल्ले तर पोटासंबंधी आणि पित्तासंबंधी समस्या होऊ शकते.