- माधुरी पेठकरहिवाळ्यात त्वचा खराब होते हे खरं असलं तरी हे अर्धसत्य आहे. कारण हिवाळ्यात त्वचा खराब व्हायलाच हवी असं मात्र नाही. हिवाळ्यात आपली त्वचा जर जास्तच शुष्क, खडबडीत , खाजरी होत असेल तर आधी आपण काय खातो याचा जरा विचार करायला हवा.
हिवाळ्यात त्वचा उत्तम ठेवण्यासाठी आपला आहार खूप मदत करतो. हिवाळ्यात त्वचेचं नुकसान होवू नये यासाठी आपला आहारही हिवाळ्याचा सामना करण्यास पूरक असायला हवा.
हिवाळ्यात काय खाल?1) हिवाळा सुरू झाला की दूध आणि दूधाचे पदार्थ जास्त प्रमाणात आहारात असायला हवेत. दुधासोबतच चीज, बटर, ताजं फळांचं योगर्ट, पनीर हे पदार्थ हिवाळ्यात खाणं आवश्यक आहे.
2) सुका मेवा खायलाच हवा. हिवाळा संपेपर्यंत सुकामेवा न चुकता खायला हवा. यासाठी एक सोपा प्रयोग करावा. दर आठवड्याला एका डब्यात सर्व प्रकारचा सुकामेवा तुकडे करून एकत्र करून ठेवावा. आणि सात दिवस तो न चुकता खावा. हिवाळ्यात 7-8 बदाम, 2 अंजीर आणि 5 आक्रोड हे खायलाच हवेत.
3) हिवाळ्यात बाजारात हिरव्यागार भाज्यांची बहार असते. बाजारात जेवढ्या प्रकारच्या भाज्या मिळतात त्या सर्व पोटात जायलाच हव्यात. पालक, ब्रोकोली, घेवडा, मटार, मेथी, सेलेरी, लेट्यूस हे सर्व आपल्या आहारात असण्याचा नियम हिवाळ्यात प्रत्येकानं पाळायला हवा.
4) रसदार फळं खाल्ल्याचा उपयोग त्वचा छान ओलसर राहण्यास होतो. दिवसातून फळांच्या किमान तीन फोडी खायला हव्यात. किंवा मग एक सफरचंद/ एक संत्री/ वाटीभर डाळिंबाचे दाणे/ वाटीभर पपईच्या फोडी यापैकी एक काहीही खाल्लं तरी त्वचेच्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो.
5 ) दूध, फळं, भाज्या, सुकामेवा यासोबतच त्वचेसासाठी ओमेगा 3 हेही खूप महत्त्वाचं असतं. जवसामधून ते मोठ्या प्रमाणात मिळतं. हिवाळ्यात चिमूटभर जवस रोज खायला हवेत. नुसते खायला आवडत नसतील तर उपमा, दलिया यांच्यावर भुरभूरून खाल्ले तरी चालतील.
6) त्वचेच्या आरोग्यासाठी पाणी पिण्याचं महत्त्वं हिवाळ्यातही कमी होत नाही. पाणी हे त्वचेसाठी अमृतासारखं आहे. हिवाळा आहे तहान लागत नाही ही सबब सांगून जर आपण पाणी कमी पित असू तर त्याचं मोठं नुकसान हिवाळ्यासारख्या कोरड्या थंड ॠतूत त्वचेला सहन करावं लागतं. कडाक्याच्या थंडीत त्वचा रसरशीत, ओलसर ठेवण्यासाठी रोज 8- 10 ग्लास पाणी प्यायलाच हवं.