व्यायम केल्यानंतर शरीरामध्ये अनेक वेदना होत असतात. काही लोक तर अनेक दिवसांनंतर सतत वर्कआउट करतात, त्यामुळे त्यांचे स्नायूंमध्ये प्रचंड वेदना होत असतात. व्यायामानंतर होणाऱ्या वेदनांमुळे लोक एक्सरसाइज करणं सोडतात. तुम्हाला जर या वेदनांपासून सुटका करून घ्यायची असेल तर तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
एवढचं नाही तर अनेक महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या तीव्र वेदनांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांमुळे महिला आपलं काम व्यवस्थित करू शकत नाहीत. या दोन्ही बाबतींमध्ये होणाऱ्या वेदनांपासून सुटका करण्यासाठी फायदेशीर ठरणारा रामबाण उपाय म्हणजे, मेथीचे दाणे. मेथीचे दाणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. मेथीमध्ये मुबलक प्रमाणात आयर्न आढळून येतं. जे महिलांसाठी अत्यंत आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला मेथीच्या दाण्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या चहाबाबत सांगणार आहोत.
तरूणी आणि महिला मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या प्रचंड वेदनांचा सामना करतात. अशातच त्यांच्यासाठी मेथीच्या दाण्यापासून तयार करण्यात आलेल्या चहाचे सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.
मेथीच्या दाण्यांपासून असा तयार करा चहा
- सर्वात आधी एका भांड्यामध्ये 4 ते 5 कप पाणी घेऊन उकळण्यासाठी गॅसवर ठेवा.
- पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे किंवा मेथीची पावडर टाका
- भांड्यावर झाकण ठेवून पुन्हा चहा उकळून घ्या.
- जेव्हा याचा रंग बदलेल त्यावेळी गॅसवरून उतरून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा.
- मेथीपासून तयार करण्यात आलेला चहा तयार आहे.
तयार चहा मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी किंवा व्यायाम केल्यानंतर होणाऱ्या स्नायूंच्या वेदना कमी होण्यासाठी मदत करतात. चवीला हा चहा थोडासा कडवट लागतो. पण वेदना दूर करण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो.
मेथी खाण्याचे आणखी काही फायदे :
- मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो. तसेच एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाचीही समस्या दूर होते.
- मेथी केसांसाठीही उपयुक्त आहे. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा.
- केस गळती थांबविण्यासाठी मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा.
- मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल.
- मेथीदाण्याची पावडरची पेस्ट तयार करून त्वचेवर लावल्यास जळाल्याचे व्रण दूर होण्यास मदत होईल.
- पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज 5 ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात.