- भक्ती सोमणएप्रिल-मे महिन्यात कैऱ्या दिसायला लागतात. या कैऱ्यांचा भरपूर वापर महाराष्ट्राप्रमाणेच भारतातल्या विविध राज्यात खूप वेगवेगळ्या प्रकारे होतो. कैरीची आंबट-गोड चव मात्र कुठल्याही पदार्थात मजा आणते.उन्हाळा सुरू झालाय याची जाणीव बाजारात कैऱ्या दिसायला लागल्यावर होते. चैत्र महिना हा तर कैरी खाण्याचा हक्काचा महिना. याकाळात चैत्र महिन्याचं हळदीकुंकू होतं तेव्हा तर किसलेली कैरी घालून केलेली आंबेडाळ आणि पन्हं. वर्षभर ज्यासाठी आसुसलेलो असतो ते आवडीचे पदार्थ खाण्याची तरतूद एप्रिल-मे महिन्यात होते. चण्याची डाळ, नारळ, कैरी आणि त्यात वरून फोडणी घालून केलेली ही आंबेडाळ कैरीमुळे मजा आणते. पन्ह्याची तर बातच न्यारी.पोळीबरोबर आयत्यावेळी टेस्टी काही खाण्याची इच्छा झाली तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे चटणी. नारळ खवलेला असेल तर चिंताच मिटली. नारळ नसला तर पुदीना, कोथिंबीर, कैरी, मीठ घालून केलेली चटणीही तोंडीलावणं म्हणून अप्रतिमच लागते. या काळात कैरीचं वर्षभर टिकणारं लोणचं हमखास होतंच. या लोणच्याबरोबरच गोड- तिखट छुंदा, कांदा- कैरी लोणचं, टक्कू असे प्रकारही होतात. त्याचबरोबर कैरीचं रस्सम, सांबार, कैरीची कढी, कैरी भात असे अनेक पदार्थ केले जातात.
लिंबाऐवजी कैरीलोणचं, टक्कू वगैरे व्यतिरिक्त कैरीचा थोड्या वेगळ््या प्रमाणात उपयोग करता येऊ शकतो. अनेकदा आंबटपणासाठी आपण लिंबाचा उपयोग करतो. त्याऐवजी एखाद्या पदार्थाला वेगळा टच देण्यासाठी लिंबाऐवजी कैरीचा उपयोग करता येईल. थाई - मॅक्सिकनमध्येही कैरी बहारमॅक्सिकन सालसात या मौसमात आंबटसर चव आणण्यासाठी कैरी अगदी बारीक चिरून वापरतात. तर थाई पदार्थांमध्येही कैरीचा छान वापर केला जातो. थाई पदार्थांमध्ये ज्या वेगवेगळ््या रंगाच्या "करी" असतात. त्यातल्या लाल आणि हिरव्या रंगाच्या करीमध्ये कैरीचा चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकतो. त्यासाठी लेमन ग्रास, कोथिंबीर, कांदा, लसूण, आलं, जीरे पावडर, काळी मिरी, लिंबाचा रस असे काही पदार्थ मिक्सरमधून काढून एकत्र करायचे. ते नारळाच्या दूधात शिजवताना त्यात आपल्याला आवडणाऱ्या भाज्या घालायच्या की झाली हिरवी करी तय्यार. अशा या हिरव्या रंगाच्या करीमध्ये लिंबाच्या रसाऐवजी कैरी घातली तरी चालू शकते. फक्त ती घालताना ठेचून घातली की तिचा रस जास्त चांगल्या प्रमाणात करीत उतरतो. याशिवायही लिंबाच्या रसाच्या वापराऐवजी वेगळा स्वाद देण्यासाठी कैरीचा वापर करता येईल.
ग्रीन मंँगो सलाडतसेच थाई ग्रीन मँगो सलाडही करतात. घरी अगदी सहज उपलब्ध असणारे पदार्थ या सॅलेडसाठी लागतात. यासाठी एका बाऊलमध्ये कैरीचे पातळ लांबट काप करायचे. त्यात बारीक उभा चिरलेला कांदा आणि भाजलेले भरडलेले शेंगदाणे, मोड आलेलं कोणतंही कडधान्य घालायचं. त्यावर आवश्यकतेप्रमाणे मिक्सरवर बारीक केलेल्या आल्याचा छोटा तुकडा, लसूण, लाल मिरच्या(ठेच्यासाठी वापरल्या जातात त्या), मध, सोया सॉस, कोथिंबीर हे सर्व घालून वरून मीठ घालायचं. आंबट, गोड, तिखट चवीचं हे सॅलेड खूप वेगळी चव देते. पुढचे दोन महिने आहेत कैरीचा हवा तो प्रयोग करून बघायला हरकत नाही!