पुणे : अनेकदा सगळ्या भाज्या आणून, चिरून मंचुरियन करणे त्रासाचे ठरते. अशावेळी फक्त फ्लॉवर किंवा फुलकोबी आणि ठराविक भाज्या वापरून उत्तम स्टार्टर म्हणून वापरता येईल. त्यामुळे घरातल्या मोठ्यांसह बच्चेकंपनीला खुश करून टाकणारा हा पदार्थ पार्टीसाठी नक्की ट्राय करा.
साहित्य :
- फ्लॉवर किंवा फुलकोबी : अर्धा किलो
- लसूण बारीक चिरलेला :दोन चमचे
- आलं बारीक चिरलेले : एक चमचा
- हिरव्या मिरच्या :दोन
- कांदा उभा चिरलेला :मध्यम आकाराचा
- ढोबळी मिरची उभी चिरलेली : एक
- टोमॅटो आणि सोया सॉस :दोन मोठे चमचे
- कॉर्नफ्लोअर किंवा मैदा :एक वाटी
- तेल
- मीठ
कृती :
- फ्लॉवरचे फक्त तुरे आणि त्यासोबत अगदी छोटे दांडे घ्या. फ्लॉवर ताजा आणि स्वच्छ पांढरा घेतल्यास चव अधिक चांगली येते.
- पातेल्यात पाणी घालून त्यात चमचाभर मीठ, आणि फ्लॉवरचे तुरे घालून दोन मिनिटे उकळी घेऊन गॅस बंद करा.
- पातेल्यावर झाकण ठेऊन फ्लॉवर तसाच पाण्यात काहीवेळ ठेवा. आता पाणी काढून फ्लॉवर एका मोठ्या पातेल्यात काढा. त्यात आलं, लसूण, मिरचीची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ टाकून कॉर्नफ्लोअर टाका. या मिश्रणात पाणी न घालता फ्लॉवरला सुटलेल्या पाण्यातंच गोळे घट्ट भिजवा,
- कढईत कडकडीत तेल टाकून फ्लॉवरचे गोळे गोल्डन ब्राऊन रंग येत नाही तोवर तळून घ्या.
- सर्व गोळे तळून झाल्यावर एका कढईत तेल तापल्यावर त्यात उभ्या चिरलेल्या दोन हिरव्या मिरची, लसूण आणि आल्याचे तुकडे घाला. त्यात कांद्याचे आणि ढोबळ्या मिरचीचे उभे काप घालून एकजीव करा.
- सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर एका वाटीत दोन मोठे चमचे टोमॅटो सॉस आणि दोन मोठे चमचे सोया सॉस आणि एक लहान चमचा कॉर्न फ्लोअर घ्या.हे सर्व मिश्रण पाण्याच्या साहाय्याने एकत्रित करून कढी इतके पातळ करा.
- हे मिश्रण कढईत घालून भाज्यांमध्ये मिसळून घ्या. आणि त्यात तयार मंचुरियन बॉल घाला. हे सर्व चांगले हलवून घ्या आणि कोथिंबीरीसह सजवून चटपटीत मंचुरियन सर्व्ह करा.