साहित्यः वाटीभर मैदा, वाटीभर कणीक, सहा चमचे तुपाचे मोहन, अर्धी वाटी किसलेले चीज, छोटा फ्लॉवर बारीक किसलेला, एक गाजर बारीक चिरलेले, वाटीभर मटारचे दाणे, छोटा कांदा, बारीक चिरलेली फरसबी दोन-तीन चमचे, आवडत असल्यास विविधरंगी सिमला मिरच्यांचे बारीक तुकडे पाव वाटी, वाफवलेल्या मक्याचे दाटे चार चमचे, तीन-चार हिरव्या मिरच्या, लहानसा आल्याचा तुकडा, चार लसणाच्या पाकळ्या, थोडा पुदीना, कोथिंबीर, चवीपुरते मीठ, चिमुटभर साखर.
कृतीः सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. मटाराचे-मक्याचे दाणे व भाज्या थोडे मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घ्या. पाणी काढून टाका. गरम असतानाच घोटून घ्या. त्यात पाणी अजिबात राहायला नको. त्यात मीठ, मिरच्या, आले, लसूण, पुदिना वगैरे एकजीव करा. कोमट असताना चीज घाला. नंतर मिश्रण थंड होऊ द्या. पिठात थोडे मीठ व मोहन घालून पोळ्यांच्या कणकेसारखी कणीक भिजवावी. फुलक्याच्या आकाराच्या दोन पोळ्या लाटून त्यात सारण भरून पराठे लाटता येतात. हे पराठे तूप सोडून भाजावेत. चीजमुळे पराठे एकदम नाजूक होतात. आतील चीज वितळत असल्याने उलटताना फार जपून व बेताने उलटावेत. हे पराठे चवीला फारच सुंदर लागतात. यात भाज्या-चीज असल्याने सोबत सॉस किंवा चटणी दिली किंवा नाही तरी चालते.