- सारिका पूरकर-गुजराथीकुछ मीठा हो जाए म्हणत चॉकलेटचा तुकडा तोंडात टाकायला कोणताही बहाना शोधला जातो.भारतीय बाजारपेठेत आणि खवय्यांच्या दुनियेत चॉकलेटनं आता अगदी अग्रभागी स्थान पटकावलं आहे. दिवाळी, रक्षाबंधनाचे गिफ्ट, कॉर्पोरेट गिफ्ट म्हणून चॉकलेट देण्याचा ट्रेण्ड रु ळला आहे. पूर्वी चॉकलेट फक्त लहान मुलंच हट्ट करून मागून घेत असत, आता मात्र एनर्जी सोर्स म्हणून लो ब्लड प्रेशरसारख्या व्याधींनी ग्रस्त व्यक्तीही पर्स, बॅगमध्ये हमखास चॉकलेट बाळगतात. आइस्क्रि म, केक यांसारख्या पदार्थांमध्येही चॉकलेट फ्लेवर आज टॉपवर आहे. हेच कमी होते की काय, सौंदर्यशास्त्रातही आता चॉकलेटचा उपयोग त्वचेचा पोत सुधरवण्यासाठी केला जाऊ लागला आहे. चॉकलेट फेशियल, चॉकलेट बाथ असे प्रयोग खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. थोडक्यात चॉकलेट आता जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनले आहे.
मात्र, चॉकलेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा तसेच कोरड्या वातावरणाचा फटका आता चॉकलेटला बसणार असून सन 2050 पर्यंत चॉकलेट जगातून नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संशोधकांच्या मते, चॉकलेट ज्या कोका बियांपासून तयार होते, त्या कोका बियांची झाडं, रोपं ग्लोबल वॉर्मिंगच्या तडाख्यात टिकाव धरु शकणार नाहीत. ही कोकाची रोपं अत्यंत नाजूक असतात. तसेच रेन फॉरेस्टसारख्या पृष्ठभागावर ही रोपं चांगली वाढतात, कारण याठिकाणी वातावरण, पाऊस आणि आर्द्रता यांचं प्रमाण वर्षभर स्थिर असतं. मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे या रोपांवर रोगांचा प्रादुर्भाव संभवतो तसेच जमिनीतील ओलावा शोषून घेतल्यामुळे अनेक भागात ही रोपं टिकवणं अवघड होणार आहे.
नॅशनल ओशियानिक आणि अॅटमॉसफिअरिक अॅडमिनिस्ट्रेशन यांच्या मते 2050 पर्यंत वाढत्या तापमानामुळे चॉकलेट उत्पादन हे 1000 फूटांपेक्षा उंचावर म्हणजेच पर्वतरांगांमध्ये घ्यावं लागेल, जे सध्या वन्यजीवांसाठी राखीव आहे. चॉकलेट उत्पादनाबाबत अन्य समस्या अशी आहे, की जगभरातील चॉकलेट उत्पादन हे सहसा गरीब शेतकरी घेताना दिसतात, त्यांच्याकडे उत्तम प्रतीची खतं, कीटकनाशकं उपलब्ध नसतात. या पद्धतीनं कोका उत्पादनाचं प्रमाण 90 टक्के आहे. अनेक गरीब शेतकरी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून कोका उत्पादन घेताहेत.
मात्र ग्लोबल वॉर्मिंगच्या विळख्यात या पद्धतीच्या कोका पिकांचा टिकाव लागणार नाहीये. म्हणूनच येत्या काही वर्षात चॉकलेटचे उत्पादन 100000 टन प्रतिवर्षी कमी होत गेलं तर नवल वाटायला नकोय. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन या रोपांचं नुकसान टाळण्यासाठी नवं तंत्रज्ञानही संशोधक विकसित करु पाहात आहेत. यामुळे बदलत्या हवामानाचा, वातावरणाचा फटका कोका रोपांना बसणार नाही. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक कॅण्डी कंपनी मार्स यांच्या सहकार्यानं हे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत.