- भक्ती सोमण
कपातून दूध, चहा, कॉफी पितात यात नवीन काय? रोजचं करतो ना आपण तसं. पण कपातून खाणंही आता सुरू झालं आहे. कोणी म्हणेल यातही काय नवीन आहे? कपातल्या चहात बिस्किटं, टोस्ट, खारी नाहीतर पोळी बुडवून आपण एरवीही खातोच की. पण याव्यतिरिक्तही आता कपात खाण्यासारखं खूप काही आहे. कपातल्या खाऊची फॅशनच झाली आहे म्हणाना ! तर आता कपात केक आणि पिझ्झा खाता येऊ शकतो. मायक्रोव्हेव्ह मध्ये गरम होऊ शकतील अशा कपात मात्र या गोष्टी करायच्या. केकसाठी लागणारा मैदा, दूध, क्रीम, कन्डेन्स मिल्क असे आवडीचे प्रकार एकत्र करून ते कपात ठेवून मायक्रोव्हेवमध्ये बेक करायचे. तो केक कपातच छान फुलतो. मग त्यावर क्रीम, चॉकलेट, ड्रायफ्रूट यानं सजवायचं. सध्या असे केक फार मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत.
तीच गोष्ट पिझ्झाची. पिझ्झासाठी लागणारा मैदा, तेल पाणी एकत्र करून त्याची पेस्ट कपात ठेवायची. त्यावर चीज, आॅलिव्ह्ज आणि थोड्याश्या भाज्या वर पेरून ते मायक्रोव्हेमध्ये ठेवायचे. कपातला हा तयार झालेला पिझ्झा दिसायला एकदम हटके आणि मस्त लागतो. हे प्रकार कसे करायचे आणि त्यासाठी किती सामान लागते याची माहिती देणारे व्हिडिओज खूप आहेत. ते बघून हे प्रकार नक्की करून बघा. पार्टीसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो! -