सध्या संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करण्यात येत आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. त्यामुळे ठिकठिकाणी दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. अंगणात किंवा दारामध्ये रांगोळ्या काढल्या जातात. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. दिवाळीचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीचा फराळ. या सणासाठी आधीपासूनच तयारी करण्यात येते. घराघरांमध्ये वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात येतात. पण तुम्हाला एक गंमत माहीत आहे का? आपल्या या विविधतेने नटलेल्या देशामध्ये फराळामध्येही विविधता आढळून येते. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ फराळ म्हणून तयार करण्यात येतात. जाणून घेऊयात कोणत्या राज्यात कोणता पदार्थ फराळ म्हणून तयार करण्यात येतो त्याबाबत...
1. राजस्थानमध्ये मावा कचोरी
राजस्थान आणि कचोरी एक समिकरणचं. दिवाळीसाठीही येथे कटोरी तयार केली जाते. पण त्यातल्या त्यात वेगळं असं वैशिष्ट्य म्हणजे येथील मावा कचोरी, जी खास दिवाळीसाठी तयार करण्यात येते. खवा आणि साखरेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या कचोरीला साखरेच्या पाकात बुडवून कोटिंग करण्यात येतं.
2. महाराष्ट्राची शान अनारसे
महाराष्ट्रात दिवाळीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानीच असते. परंतु त्यातल्यात्यात एक वैशिष्ट्य म्हणजे येथे तयार करण्यात येणारे अनारसे. यासाठी तांदळाचे पिठ आणि गुळ एकत्र करून तयार करण्यात येतं. त्यावर खसखस लावली जाते. दिवाळीसाठी घराघरामध्ये अनारसे तयार करण्यात येतात.
3. दिल्लीची खासियत खील-बताशा
फक्त दिल्लीच नव्हे तर उत्तरेकडील राज्यांमध्ये हा पदार्थ तयार करण्यात येतो. खील तांदळाचा वापर करून करण्यात येते आणि बताशा साखरेचा वापर करून तयार करण्यात येतो. याचा वापर दिवाळीच्या पूजेसाठीही करण्यात येतो. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी अनेक खेळण्यांच्या आकारात बताशे तयार करण्यात येतात.
4. मध्य प्रदेशातील चिरोजीची बर्फी म्हणजेच चारोळीची बर्फी
मध्य प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये दिवाळीसाठी चिरोजीची बर्फी तयार करण्यात येते. ही बर्फी तयार करण्यासाठी बदाम, मावा आणि चारोळ्यांचा वापर करतात. मध्य प्रदेशमध्ये तयार करण्यात येणारी ही बर्फी एकदा तरी नक्की चाखून पाहा.
5. गुजरातमधील मोती पाक
गुजराती पक्वानांचे प्रत्येकजण शौकीन असतात. ढोकळा, जलेबी-फाफडा यांसारख्या पदार्थांचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं पण दिवाळीमध्ये एक खास पदार्थ गुजरातमध्ये तयार करण्यात येतो. गुजरातमध्ये तयार करण्यात येणारी मोती पाक ही प्रसिद्ध बर्फी पिठ, खवा आणि साखरेपासून तयार करण्यात येते. गुजरातसह राजस्थानमध्येही मोती पाक तयार करण्यात येते.
6. उत्तराखंडची संस्कृती सिंघल
उत्तराखंडमधील कुमाऊं क्षेत्रात दिवाळीच्या दिवशी सिंघल नावाचा एक पदार्थ तयार करण्यात येतो. यासाठी पिठ, रवा, दही, मशरूम, केळी, साखर आणि वेलची पावडर या सर्व गोष्टी एकत्र करून तूपामध्ये तळण्यात येतात.
7. पंजाबची पिन्नी
पंजाबच्या अनेक भागांमध्ये दिवाळीसाठी अनेक स्वादिष्ट मिठाया तयार करण्यात येतात. पिन्नी तयार करण्यासाठी पिठ आणि तूपाचा वापर करण्यात येतो. याव्यतिरिक्त यामध्ये भरपूर ड्रायफ्रुट्स, खवा आणि साखरेचा वापर करण्यात येतो. हे मिश्रण एकत्र करून यांना लाडूचा आकार देण्यात येतो.
8. ओडिशातील रसबाली
ओडिशामध्ये रसबाली एक प्रसिद्ध पदार्थ आहे. हा पदार्थ खासकरून दिवाळीसाठी तयार करण्यात येतो. हा पदार्थ साधारणतः रबडीप्रमाणे दिसतो, ज्यासाठी खवा, साखर आणि ड्राय फ्रुट्सपासून तयार करण्यात येतं. जगन्नाथ मंदीरामध्ये दाखवण्यात येणाऱ्या छप्पन भोगपैकी हा पदार्थ एक आहे.
9. गोव्याची परंपरा 'फू'
आपण रोज म्हटलं तरी नाश्त्याला पोहे खातो. परंतु गोव्यामध्ये पोह्यांपासून तयार करण्यात येणारा फू नावाचा पदार्थ खास दिवाळीसाठी तयार करण्यात येतो. हा गोव्यातील पारंपारिक पदार्थांपैकी एक आहे.
10. उत्तर प्रदेशामधील सूरणाची भाजी
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिवाळीसाठी सूरणाची भाजी तयार करण्यात येते. आपण इतर दिवशीही ही भाजी तयार करू शकतो परंतु दिवाळीमध्ये तयार करण्यात येणारी ही भाजी अनोख्या पद्धतीने तयार करण्यात येते.