-माधुरी पेठकरशिजवलेलं अन्न हा शरीराच्या पोषणाचा मुख्य मार्ग आहे. उकळणं, वाफवणं, तळणं, भाजणं, परतवणं अशा विविध प्रक्रियेतून तयार होणारं अन्न आपण रोज खातो. पण सर्वच पदार्थ हे यापध्दतीनं शिजवलेले असायला हवेत असं नाही. काही पदार्थ हे कच्चे खाल्ले तर शरीराला जास्त पोषक घटक मिळतात. त्या पदार्थातले पोषक घटक कोणतीही हानी न होता थेट शरीरापर्यंत पोहोचतात.अन्न विविध प्रकारे शिजवण्याच्या प्रक्रियेत त्या पदार्थातल्या मूळ घटकांचं थोड्या फार प्रमाणात नुकसान होत असतं. पण काही पदार्थ असे आहेत की त्यावर वाफवणे, उकळवणे, भाजणे, तळणे अशा काही प्रक्रिया केल्या तर त्यांच्यातल्या पोषण मूल्यांची खूपच हानी होते. जसे ब्रोकोली, पालेभाज्या, बेरी फळं, सुकामेवा, पेरू , मोड आलेली कडधान्यं हे पदार्थ कच्चे खाणं जास्त फायदेशीर असतात.
ब्रोकोली
या हिरव्यागार भाजीत क जीवनसत्त्वं आणि कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असतं. शिवाय सल्फोराफेन नावाचा महत्त्वाचा घटक असतो जो हदययाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो.जर ब्रोकोली फ्लॉवरसारखी उकळली तर त्यातलं 70 सफ्लोराफेन नष्ट होतं.त्यामुळे ब्रोकोली कच्ची खाणं जास्त उपयुक्त असतं.
ओलं खोबरं
ओल्या नारळात इलेक्ट्रोलाइटस असतात. ओल्या नारळात उपयुक्त आणि फायदेशीर फॅटस असतात. सुक्या खोब-यात किंवा डेसिकेटेड नारळात ओल्या नारळाची तत्त्वं शिल्लक राहात नाही. त्यामुळे ओलं नारळ तसंच खावं.
सिमला मिरची
लाल पिवळ्या आणि हिरव्या सिमला मिरचीत क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. 375 अंश सेल्सिअसच्या तापमानावर जर सिमला मिरची शिजवली तर त्यातली सर्व पोषणमूल्य नष्ट होतात. आणि क जीवनसत्त्व तर उष्णतेला अतीसंवेदनशील असतं.
बेरी फळं
ओल्या बेरी फळांमध्ये रसाच्या स्वरूपात मोठा प्रमाणात पोषक तत्त्वं आणि खनिजं असतात. ही बेरी फळं वाळवली तर ही जीवनसत्त्वं आणि खनिजं कमी होतात.
सुकामेवा
काजू, बदाम, पिस्ते हे खारवलेल्या स्वरूपात खायला अनेकांना आवडतं. पण हे खारवताना त्यांना भाजलं जातं. भाजण्याच्या प्रक्रियेमध्ये सुकामेव्यातील लोह, खनिजं आणि फॉस्फरससारखे महत्त्वाचे घ्टक निघून जातात. त्यामुळे सुकामेवा तसाच खाणं उत्तम.
पेरूपेरू कच्चा खाणं जास्त चांगल. पेरूचे पदार्थ बनवताना पेरूवर शिजवण्याची प्रक्रिया केली जाते. पेरूचे पदार्थ लागतात उत्तम पण त्यात रसरूपात असलेली पोषक मूल्यं उडून जातात. म्हणूनच कच्चा किंवा पिकलेला पेरू खाणंच उत्तम.
मोड आलेल्या उसळींमध्ये क जीवनसत्त्वं, फायबर, तांबं, मॅग्नीजसारखी खनिजं असतात. शिजवण्याच्या प्रक्रियेत या घटकांचा नाश होतो. मोड आलेल्या उसळी कच्च्या खायला हव्यात.