मुंबई- सगळी फळं कापल्यावर लगेच संपवता येत नाहीत. कापून तुकडे केलेल्या फळांचा हवेशी संपर्क आल्यावर ती लगेच काळी पडतात. त्यामुळे फळे कापल्यावरही ताजी राहावीत यासाठी काही प्रयत्न करता येतील. सफरचंदासारख्या फळांमध्ये लोह असते. फळे कापल्यावर त्यातील अंतर्गत पेशी मरु लागतात, त्यांचा हवेशी संपर्क आला की पोलीफेनॉल नावाचे संप्रेरक निर्माण होते आणि आयर्न ऑक्साइडचा एक थर फळांवर तयार होतो. त्यामुळे कापलेली फळं काळी दिसू लागतात.
1) लिंबाच्या रस या फळांना लावल्यामुळे फळांचे तुकडे काळे होण्याची क्रिया मंदावते. लिंबाच्या रसाचा उपयोग करण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात.2) फळं कापल्यामुळे त्यांचा हवेशी संपर्क येतो आणि ती काळी पडतात, हे रोखण्यासाठी फळं थंड पाण्यात पूर्णपणे बुडवावीत. तू पूर्ण बुडवणे अत्यंत आवश्यक आहे.3) अर्धा चमचा मीठ पाण्यात विरघळवून त्या मिश्रणामध्ये कापलेली फळे तीन ते पाच मिनिटे बुडवावीत. त्यामुळेही कापलेल्या भागाचा हवेशी संपर्क कमी येतो आणि ती काळी पडत नाहीत.4) फळ कापल्यावर त्यांच्यावर रबर बँड लावून त्यांना पुन्हा मूळ फळाच्या आकारात बांधून ठेवता येईल त्यामुळेही त्यांचा हवेशी संपर्क कमी येईल.5) सायट्रिक अॅसिड असलेल्या कोणत्याही सोड्यात फळ बुडवल्यास त्यांचा हवेशी संपर्क कमी होईल. मात्र सोड्यामुळे फळांचा स्वाद कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळांवर साखर घालून ती खाता येतील.6) फळांचे तुकडे हवाबंद पिशवीत घालून ठेवता येतील, हा एकदम सोपा उपाय आहे.7) अॅस्कॉर्बिक अॅसिडची पावडरही फळांवर शिंपडता येईल. यामुळे फळं काळी पडणार नाहीत. अॅस्कॉर्बिक अॅसिड म्हणजे क जिवनसत्त्व होय.