(Image Credit : La Fuji Mama)
खजूर हे फळ आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत असेल. खजूरामध्ये ग्लूकोज आणि फ्रक्टोस भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे खजूर खाल्याने शरीराला भरपूर एनर्जी मिळते. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात खजूराचा समावेश कराल तर अनेक गंभीर समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळेल. तसेच दुधाचेही फायदे तुम्हाला माहीत आहेत. दूध प्यायल्याने शरीराला कॅल्शिअम मिळतं, ज्यामुळे हाडांना मजबूती मिळते. शरीराला अनेकप्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात.
दूध आणि खजूराचे एकत्र फायदे
दूध आणि खजूराचे एकत्र सेवन केल्यास फायदे अधिक जास्त होतात. दूध आणि खजुराचा शेक तयार करुन सेवन करु शकता किंवा दूध पितांना खजूर तसेही खाऊ शकता. काही लोकांना खजूर लवकर पचत नाही. त्यामुळे आधी कमी प्रमाणात खावे. जर याने तुमचं पोट बिघडलं नाही तर प्रमाण वाढवू शकता.
सांधेदुखी होईल कमी
खजूर आणि दुधामध्ये कॅल्शिअमचं भरपूर प्रमाण असतं. अनेकांना सांधेदुखी ही वाढत्या वयात होत असते, पण आता ही कमी वयातही होऊ लागली आहे. हे लाइफस्टाइलमधील बदल आणि योग्य आहार न घेणे यामुळे होतं. हाडांच्या मजबूतीसाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे.
खजूर आणि दुधाचा शेक तुमच्या शरीरातील हाडांसाठी फायदेशीर आहे. हा शेक तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता. याने हाडांच्या समस्या दूर होतील. लहान मुलांच्या हाडांचा याने विकासही चांगला होतो. याचं दिवसातून तिनदा सेवन करु शकता.
पचनक्रिया होते चांगली
खजूरामध्ये व्हिटॅमिन ए, ही कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन के, आयर्न, कॉपर, मॅग्नेशिअम, मॅग्नीज इत्यादी तत्व आढळतात. तसेच खजुरामध्ये फायबरचं प्रमाणही भरपूर असतं. त्यामुळे पचनक्रियेसाठी हे फायदेशीर आहे. पचनक्रिया योग्य नसली तर शरीराचा रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि अशात अनेक आजारांची लागण होऊ शकते. पण खजूर आणि दुधाचं सेवन केलं तर तुम्हाला फायदा होईल.
कसा तयार कराल शेक?
मिल्क-खजूर शेक तयार करण्यासाठी एक ग्लास दूध, ५ ते ६ खजूर, २ ते ४ काजू आणि काही बदाम घ्या. खजुराच्या बिया काढून छोटे छोटे तुकडे करा. या मिश्रणात एका चमचा साखर टाकून मिक्सरमधून बारीक करा. तुमचा खजूर शेक तयार आहे. हा शेक सकाळी नाश्ता करताना घेतल्यास तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो.