(Image Credit : Organic Facts)
आपण सारेच जाणतो की, ऑरेंज ज्यूस सौंदर्यासोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-सी असतचं तसेच अॅन्टीऑक्सिडंटही असतात. चवीला उत्तम असण्यासोबतच ऑरेंज ज्यूस शरीराला ऊर्जा देण्यासाठीही अत्यंत उपयोगी ठरतो. तुम्ही ऑरेंज ज्यूसचा समावेश सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा जिमनंतरही करू शकता.
ऑरेंज ज्यूस किंवा संत्र्याचा ज्यूस आरोग्यसाठी फायदेशीर असता तरिही आपल्यापैकी अनेकांना याबाबत माहीत नाही की, ऑरेंज ज्यूसचे दररोज सेवन केल्याने स्ट्रोकचा धोका कमी होतो. हे आम्ही नाही सांगत आहोत तर एका संशोधनातून सिद्ध झालं आहे.
ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, ज्या व्यक्ती दररोज ऑरेंज ज्यूसचं सेवन करतात, त्यांच्यामध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका ऑरेंज ज्यूस न पिणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत 24 टक्क्यांनी कमी असतो. तसेच हृदयाशी निगडीत आजारांचा धोकाही कमी होतो. हे संशोधन करण्यासाठी संशोधकांच्या टिमने जवळपास 20 ते 70 वर्षांच्या 35,000 पुरूष आणि महिलांची तपासणी केली.
साधारणतः ताज्या फळांचे ज्यूस आरोग्यासाठी हेल्दी समजले जातात. परंतु मागील काही वर्षांपासून ज्यूसमध्ये वापरण्यात येणाऱ्या जास्त साखरेच्या प्रमाणामुळे लोकांना याबाबत सावधही करण्यात आले आहे. अनेकदा ज्यूस तयार करताना त्यामध्ये साखरेचा जास्त वापर करण्यात येतो. त्यामुळे ज्यूसमधील अनेक पोषक तत्व शरीरापर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणून डॉक्टर्सही ताज्या फळांचे किंवा भाज्यांचे ज्यूस साखरेशिवाय किंवा कमी प्रमाणात साखरेचा वापर करून पिण्याचा सल्ला देतात.
नेदरलॅन्ड नॅशनल इंस्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी सांगितले की, फक्त ऑरेंज ज्यूसच नाही तर दुसरे ज्यूसही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तसेच त्यामुळेही स्ट्रोकचा धोका कमी होतो. दरम्यान, संशोधकांच्या टिमने असंदेखील सांगितलं की, ज्यूसचे अनेक फायदे असतात. हे खरं असलं तरिही लोकांनी जास्त प्रमाणात ताज्या फळांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
टिप : वरील सर्व बाबी संशोधनातून सिद्ध झाल्या आहेत. आम्ही सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून सर्वांपर्यंत पोहोचवत असून त्यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.