पुणे : महाराष्ट्राची ओळख म्हणजे पुरणपोळी. छान शिजलेलं, वेलदोडा आणि जायफळ घातलेलं पुरण आणि तूप घालून खरपूस भाजलेली पोळी असली की नुसतं पोटचं नाही तर मनसुद्धा भरतं.पण अनेकदा हरभऱ्याची डाळ शिजवण्यापासून ते ती वाटून घेण्यापर्यंतची प्रक्रिया करताना गृहिणी थकून जातात. त्यामुळे एखाद्यावेळी जर वेळ नसेल तर पारंपरिक पद्धती ऐवजी एक वेगळी आणि वेळ वाचवणारी पुरण करण्याची पद्धत आम्ही देत आहोत. तेव्हा ही पाककृती नक्की करा.
साहित्य :(सात ते आठ मध्यम पोळ्यांकरिता)
- १ वाटी हरभरा डाळीचे पीठ (बेसन)
- तूप अर्धा वाटी
- एक वाटी दूध
- साखर अर्धा वाटी
- गूळ अर्धा वाटी
- वेलदोडा पूड
- जायफळ पूड
कणकेसाठी साहित्य :
- दीड वाटी गव्हाचे पीठ
- दोन चमचे मैदा
- पाणी
- मीठ चिमूटभर
कृती :
- कणिक आणि मैदा एकत्र चाळून त्यात चिमूटभर मीठ घालावे.
- या पीठात थोडे थोडे (लागेल तसे) पाणी घालून रोजच्यापेक्षा जरा सैल कणिक भिजावावी.
- ही कणिक कमीत कमी अर्धा तास आधी भिजवून ठेवावी.
पुरणाची कृती :
- बारीक गॅसवर १ वाटी बेसन दोन ते तीन चमचे साजूक तुपावर चांगले भाजावे.
- साधारण गुलाबीसर रंग येईपर्यंत बेसन भाजावे.
- त्यात एक दूध घालून एकजीव करून घ्यावे.
- हे मिश्रण पातळ असतानाच त्यात गूळ, साखर, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घट्ट होईपर्यंत परतून घ्या.
- गॅस बंद करून तयार पुरण भांड्यात काढून घ्या.
पुरणपोळीची कृती :
- सैलसर कणकेचा गोळा घेऊन त्यात तेवढ्याच पुरणाचा गोळा घेऊन पारी भरून घ्या.
- लाटण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने लाटून मध्यम आचेवर तूप टाकून पोळी भाजून घ्या.
- झटपट आणि गरमागरम पुरणपोळी तयार.