अहमदनगर: गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्समधून आणलेला १ हजार ५०० किलो बनावट खवा अन्न, औषध प्रशासनाच्या पथकाने जप्त केला आहे. मंगळवारी दुपारी शहरातील सक्कर चौकातील वाहन पार्किंग येथे ही कारवाई करण्यात आली. ऐन दिवाळीच्या तोंडावर आरोग्यास अतिशय हानिकारक असलेला हा खवा स्वरुपातील पदार्थावर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्समधून बनावट खवा नगरमध्ये आणला असल्याची माहिती अन्न, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांना मिळाली होती. शिंदे यांच्यासह अन्नसुरक्षा अधिकारी प्रदिप कुटे, शरद पवार,नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांनी सदर ट्रॅव्हल्सची तपासणी केली तेव्हा सिटांच्या खाली व ट्रॅव्हल्सच्या पाठीमागील बाजुला गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट खव्याचा साठा आढळून आला. या खव्याची २ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत आहे. नगरमधील योगेश खंडेलवाल, गणेश डेअरी, रामस्वरुप भाई व बारामती येथील फारुकभाई नावाच्या व्यक्तीने हा खवा मागितला होता. अशी माहिती सहायक आयुक्त शिदें यांनी दिली. तपासणीसाठी नमुने घेऊन हा माल तत्काळ नष्ठ केला जाणार आहे. तसेच सर्व दोषींवर अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत कारवाई केली जणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.